सध्या परतीच्या पावसाचा सर्वत्र धुमाकूळ सुरू असून चिक्कोडी तालुक्याच्या पाणलोट क्षेत्रातही जोरदार पर्जन्यवृष्टी होत असल्याने पूर्ण क्षमतेने भरलेल्या धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग कृष्णा नदी पात्रात होत आहे. परिणामी नदीची पातळी 6 फुटाने वाढली असून कल्लोळ -येडूर आणि मलिकवाड -दत्तवाड हे बंधारे पाण्याखाली गेले आहेत. पाण्याची पातळी सतत वाढत असल्यामुळे नदी काठच्या प्रदेशात धास्ती निर्माण झाली आहे.
सध्याच्या पावसामुळे कल्लोळ -येडूर दरम्यानचा बंधारा सहाव्यांदा पाण्याखाली गेला आहे. सध्या पडत असलेला पाऊस असाच कायम राहिल्यास पाण्याच्या पातळीत आणखी वाढ होऊन वाहतूक विस्कळीत होण्याचा धोका आहे. गतवर्षीप्रमाणे यंदादेखील ऑक्टोबर महिन्यात परतीच्या पावसाने चिक्कोडी तालुक्यात सर्वत्र कहर केल्याचे दिसून येत आहे.
परिणामी अनेकांना नुकसानीला सामोरे जावे लागले असून चार महिन्यांपासून होत असलेल्या पावसामुळे भूजल पातळीत वाढ झाली आहे. तालुक्यात होत असलेल्या संततधार पावसामुळे सलग दुसऱ्या वर्षी सर्वत्र पाणीच पाणी पहावयास मिळत आहे. शिवारांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
पावसाच्या पाण्यामुळे छोटे नाले, ओढे तुडुंब भरून वाहताना दिसत आहेत. पाण्यासाठी तहानलेल्या दुष्काळी भागातही दमदार पाऊस झाल्याने तेथील विहिरी कूपनलिका व तलावांच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे.
परिणामी तेथील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. दुष्काळी भागात जरी समाधान व्यक्त होत असले तरी नदीकडच्या भागात सध्या धास्तीचे वातावरण निर्माण झाले आहे.