खानापूर तालुक्यातील दारोळी गावानजीक बिबट्याचा वावर वाढला असून रविवारी सकाळी या गावानजीक बिबट्याच्या पावलांचे ठसे आढळून आल्यामुळे परिसरात घबराट पसरली आहे.
दारोळी गावानजीक असलेल्या हेमंत पाटील यांच्या शेतामध्ये हे बिबट्याच्या पावलांचे ठसे आढळून आले आहेत. याबाबतची माहिती अशी की हेमंत पाटील शनिवारी सायंकाळी 7 वाजता गावाला गेले होते त्यानंतर सायंकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास ते घरी परते.
त्यावेळी त्यांचा अडीच महिन्याचा कुत्रा शेतातून हरवला असल्याचे त्याचप्रमाणे आणखी एका मोठ्या कुत्र्याच्या गळ्याला जखमा झाल्याचे त्यांच्या ध्यानात आले. त्यानंतर रविवारी सकाळी हेमंत पाटील आपल्या शेतात गेले असता एके ठिकाणी त्यांना बिबट्याच्या पावलांचे ठसे दिसून आले.
त्यांनी ही माहिती लागलीच गावकऱ्यांना दिली. तेंव्हा प्राणी तज्ञांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन शेतातील मातीत उमटलेल्या पावलांच्या ठशांची पाहणी करून ते बिबट्याचेच असल्याचे स्पष्ट केले.
यासंदर्भात सध्या वनखात्याचे अधिकारी अधिक तपास करीत आहेत. दरम्यान, गावानजीक बिबट्याच्या पावलांचे ठसे आढळून आल्यामुळे दारोळीमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.