बेळगांव पोलीस खात्यातर्फे कोविड नियमांचे पालन करून आयोजीत यंदाचा पोलिस हुतात्मा दिन कार्यक्रम आज बुधवारी सकाळी अत्यंत साधेपणाने पार पडला.
दरवर्षी 21 ऑक्टोंबर रोजी देशभरात पोलीस हुतात्मा दिन कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. त्यानुसार बेळगांव पोलीस खात्यातर्फे पोलीस परेड ग्राउंडवरील हुतात्मा स्मारकाच्या ठिकाणी आज बुधवारी सकाळी हुतात्मा दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ उपस्थित होते. प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी पुष्पचक्र अर्पण करुन पोलीस हुतात्मा स्मारकाला अभिवादन केले.
त्याचप्रमाणे आयजीपी राघवेंद्र सुहास, पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराज, जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी, अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख अमरनाथ रेड्डी, लोकायुक्त एस पी यशोदा वंटगुडी आदी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी स्मारकास पुष्पचक्र अर्पण करुन हुतात्म्यांना अभिवादन केले. त्यानंतर पोलीस दलात कर्तव्य पार पाडताना हौतात्म्य पत्करलेल्या पोलिसांना हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडून श्रद्धांजली वाहण्यात आली.
याप्रसंगी बोलताना जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी राष्ट्रासाठी, राष्ट्राच्या सेवेसाठी तसेच कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिलेल्या सर्व पोलिसांच्या आत्म्याला परमेश्वर शांती देवो, अशी प्रार्थना केली. तसेच कोरोना प्रादुर्भाव आणि पूर परिस्थिती प्रसंगी पोलिसांनी बजावलेल्या अत्युत्तम कामगिरीबद्दल गौरवोद्गार काढले. आयजीपी राघवेंद्र सुहास यांनी आपल्या भाषणात यावर्षी देशामध्ये इन्स्पेक्टर मनीषकुमार, एएसआय उदयराज सिंग, हरिचंद्र गिरी, हेडकॉन्स्टेबल शरीफ, उपेंद्र, बसवकुमार, संगीता तानजी, कॉन्स्टेबल धर्मेन्द्रकुमार मीना, रवींद्र प्रताप सिंग, रहमत पाशा व रामसिंग गुज्जर यांनी आपले कर्तव्य बजावताना हौतात्म्य पत्करल्याचे सांगितले.
पोलिस हुतात्मा दिनाचे औचित्य साधून यावेळी पोलीस ध्वज स्टिकरचे अनावरण करण्यात आले. याप्रसंगी डीसीपी डॉ विक्रम आमटे व डीसीपी निलगार यांच्यासह एसीपी, सीपीआय आदी सर्व हुद्यांवरील पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचारी उपस्थित होते.