1 नोव्हेंबर काळा दिनी मध्यवर्ती म. ए. समितीचे नेते जे सांगतील त्याप्रमाणे त्यांच्या आदेशानुसार कायदा व सुव्यवस्था भंग न करता आंदोलनात सहभागी व्हा, अशी सूचना शहरातील प्रमुख पोलीस ठाण्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी युवा समितीच्या पदाधिकाऱ्यांना दिली आहे.
1 नोव्हेंबर रोजी काळा दिन पाळण्यासाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने परवानगी मागितली असताना दुसरीकडे कोरोनाचे कारण पुढे करून पोलीस खाते ही परवानगी देण्यास चालढकल करत आहे. परिणामी काळा दिनाच्या परवानगीसाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांप्रमाणे युवा समितीच्या पदाधिकाऱ्यांना देखील पोलीस ठाण्यांचे उंबरठे झिजवावे लागत आहेत.
काल खडेबाजार पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक धीरज शिंदे यांनी युवा समितीच्या पदाधिकाऱ्यांना बोलावून सूचना केल्या होत्या. त्यानंतर आज शुक्रवारी सकाळी मार्केट पोलीस स्थानकाचे एसीपी सदाशिव कट्टीमणी खडे बाजार ए सी पी चंद्रप्पा व ए पी एम सी पोलीस निरीक्षक जावेद मुशाफिरी यांनी देखील ए सी पी कार्यालयात बोलवून सूचना केल्या.
मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते ज्याप्रमाणे सांगतील त्याप्रमाणे त्यांच्या आदेशानुसार कायदा व सुव्यवस्था हातात न घेता शांततेने आंदोलन करा, असे कट्टीमणी यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना सांगितले. याप्रसंगी पोलिस निरीक्षक जावेद मुशाफिरी देखील उपस्थित होते.
कट्टीमनी यांच्याप्रमाणे सायंकाळी मार्केटचे पोलीस निरीक्षक संगमेश शिवयोगी यांनी देखील युवा समितीच्या पदाधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत. सार्वजनिकरित्या अथवा सोशल मीडियावर कोणत्याही प्रकारची आक्षेपार्ह टिप्पणी करू नये, असे त्यांनी सांगितले आहे. याप्रसंगी युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके,तालुका पंचायत सदस्य सुनील अष्टेकर यांच्यासह इतर पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.