Thursday, December 26, 2024

/

थरथरत्या हाताची काठी बनलेली रणरागिणी-

 belgaum

मातृत्वासोबत कर्तृत्वाला सलाम करण्यासाठी समाजातील नवदुर्गा ‘बेळगाव लाईव्ह’ च्या माध्यमातून प्रकाशझोतात आणत आहोत. नवदुर्गा.. ज्यांनी स्त्री-पुरुष या भेदापलीकडे जाऊन पुरुषाच्या बरोबरीने अनेक क्षेत्रात पुढाकार घेतला आहे.. अशा नवदुर्गांची कहाणी आपण पहात आहोत. आज नवरात्रीची सातवी माळ.. यानिमित्ताने बेळगावमधील वृद्धांच्या संगोपनासाठी कार्यतत्पर असणाऱ्या ‘शांताई’ या वृध्दाश्रमाच्या सहव्यवस्थापिका रेखा बाळेकुंद्री यांच्याशी केलेली बातचीत…

काळ बदलला आणि त्यासोबतच संस्कृती बदलत गेली. परंपरा आणि नातीही फॅशन स्टेटमेंटप्रमाणे बदलत गेली. काही नाती स्वार्थासाठी.. काही नाती जबरदस्तीने तर खरोखरच काही नाती ही कर्तव्याची जाण ठेवणारी असतात. रक्ताच्या नात्यांपेक्षाही जोडलेली नाती अधिक घट्ट असतात. आणि त्या नात्यांची ओढही काही वेगळीच असते. समाजातील कुटुंब पद्धतीची परिभाषा बदलली आहे. जीवनाच्या शेवटच्या क्षणी जेव्हा आधाराची गरज असते अशावेळीच काही नात्यांना ‘आऊटडेटेड’ म्हणवून हिणवलं जातं आणि त्यांना नाकारलं जातं. माणसंच माणसाला नाकारतात आणि नंतर माणसंच माणसांना स्वीकारतात. अशाच माणसांना आधार देण्यासाठी बेळगावमध्ये एक संस्था अनेक वर्षांपासून कार्यरत आहे. आणि ती संस्था म्हणजेच ‘शांताई’. या वृद्धाश्रमात अनेक उतार वयातील ज्येष्ठांसाठी काम केले जाते. अशाच वृद्धांचे संगोपन करणाऱ्यांपैकी एक म्हणजेच या वृध्दाश्रमाच्या सहव्यवस्थापिका रेखा रणजीत बाळेकुंद्री.

म्हातारपण म्हणजे दुसरं बालपण म्हटलं जातं खरं, पण हे दुसरं बालपण नको वाटावं, इतकं भयानक स्वरुप आज या मानवी अवस्थेचं आहे. वृद्धांच्या समस्यांचे स्वरूप आणि व्याप्ती बदलते आहे. अशा वेळी ‘वृद्धाश्रम’ हे वृद्धांसाठी सुखावह ठरते. बेळगावमध्ये बम्मनवाडी येथे असणाऱ्या शांताई वृद्धाश्रमात निराधार आणि निराश्रित अशा ६० वर्षांपर्यंतच्या वृद्धांना प्रवेश देण्यात येतो. या वृद्धाश्रमाचे अध्यक्ष विजय पाटील हे आहेत तर कार्याध्यक्ष माजी महापौर विजय मोरे हे आहेत. या वृध्दाश्रमासाठी रेखा बाळेकुंद्री यांच्यासमवेत अनेक कर्मचारी कार्यरत आहेत. १ नोव्हेंबर २०१४ पासून या वृद्धाश्रमातील वृद्धांच्या सेवेत रुजू झालेल्या रेखा बाळेकुंद्री यांना या सर्वांच्या सेवेत समाधान मिळते असे त्या सांगतात.Rekha shantai

या वृद्धाश्रमात जवळपास ४५ हुन अधिक जणांचा समावेश आहे. यांच्या सेवेसाठी त्या दररोज ४५ कि. मी. चा प्रवास करतात. म्हातारपणात प्रत्येक वृद्ध हा लहान मुलाप्रमाणे वागतो. तितकीच भांडणे, हट्टीपणाही त्यांच्यात असतो. परंतु हे सर्व सांभाळताना त्यांच्या मानसिकतेचा विचार करून प्रत्येकाला आपण सांभाळून घेतो. शिवाय त्यांच्या उतारवयातील या स्वभावाबरोबरच त्यांचा प्रेमळपणाही तितकाच आपल्याला भावतो. या सर्वांच्या सेवेत वेळ कसा निघून जातो याचे भान रहात नाही. प्रत्येकाकडे १ किंवा २ आजी-आजोबा असतात. परंतु आपल्याकडे ४५ हुन अधिक आजी-आजोबांचे प्रेम मिळवता येते असे त्या सांगतात. रेखा बाळेकुंद्री यांच्यासमवेत शांताईची संपूर्ण टीम या वृद्धांच्या शारीरिक, मानसिक समस्या सोडविण्यात अग्रेसर आहे. या वृद्धाश्रमातील प्रत्येक घटक हा आपल्या कुटुंबाचा भाग असल्याप्रमाणेच आम्ही वावरतो. या संस्थेच्या संचालिका विजया पाटील, मारिया मोरे यांच्या मार्गदर्शनानुसार बरीच कामे सुलभ होतात.

मोठ्यांचा आदर करावा, त्यांचा सन्मान करावा, असे संस्काराचे धडे शाळे-बिळेतून लहानग्यांना कायम शिकवले जातात. मात्र, मुळात जेव्हा शिकवणाऱ्या मंडळींना मोठ्यांचा आदर करण्याची वेळ येते, तेव्हा मात्र इतरांना शिकवलेल्या गोष्टींचा विसर पडतो. मुलांना संस्काराचे धडे देणारी मंडळीच घरातल्या म्हाताऱ्यांना वृद्धाश्रमात ठेवण्याचा विचार करतात किंवा त्यांचीशी तुसडेपणाने वागताना दिसतात, हे वास्तव आहे. याला अपवाद आहेत. पण ते कमीच. अनेक मुले आमच्या आश्रमात येतात परंतु मुले असणाऱ्या वृद्धांना आणि कोणत्याही प्रकारचे निवृत्ती वेतन मिळणाऱ्या वृद्धांना शांताई वृद्धाश्रमात प्रवेश देण्यात येत नाही. शिवाय या आश्रमात असलेल्या वृद्धांकडून कोणतेही मानधन घेण्यात येत नाही. ज्यांना खरोखरच आसऱ्याची गरज आहे, आणि जे निराधार आहेत, त्यांनाच या आश्रमात प्रवेश देण्यात येतो. केवळ लोकवर्गणीवर हे आश्रम सुरु असून माझ्यासह अनेक लोक या आश्रमातील वृद्धांच्या सेवेसाठी झटतात. शिवाय कोणत्याही मंदिरात जाऊन देवाची सेवा करण्यापेक्षा या वृद्धांच्या सेवेतच आपल्याला देवपुजेचे समाधान मिळते, असे त्या सांगतात.Shantai rekha

आजच्या तरुणपिढीला अशा लोकांच्या व्यथा जाणून घेणे गरजेचे आहे. शिवाय केवळ एखाद- दुसऱ्या दिवशी अशा आश्रमांना भेट न देता आपण या समाजाचा भाग आहोत ही गोष्ट लक्षात घेऊन आपण समाजकार्य करावे. समाजातील अडलेल्या, नडलेल्या गरजूंना आपल्या मदतीचा एक हात पुढे करावा, समाजाकडून जशा आपण अपेक्षा ठेवतो त्याचप्रमाणे समाजाच्याही आपल्याकडून काही अपेक्षा आहेत, याचे भान प्रत्येकाने ठेवावे, असे त्या सांगतात. याव्यतिरिक्त महिलांवरील वाढत्या अत्याचाराचे प्रमाण हे चिंताजनक असून महिलांनी आता कोणत्याही पद्धतीचा न्यूनगंड न ठेवता कणखर आणि सक्षम व्हावे, असे मत त्यांनी ‘बेळगाव लाईव्ह’ शी बोलताना व्यक्त केले.

निराधारांच्या थरथरत्या हाताची काठी बनून, त्यांच्या आसऱ्यासाठी मदतीचा हात पुढे करून आयुष्याच्या उतारतीची वाट सुकर करून, अनोखी सेवा करणाऱ्या रेखा बाळेकुंद्री यांना ‘बेळगाव लाईव्ह’चा सलाम आणि पुढील आयुष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा!

-वसुधा कानूरकर- सांबरेकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.