देशात अनेक ठिकाणी अनलॉक ५.० सुरु झाले असून हळूहळू लॉकडाऊनचे नियमही शिथिल करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर उचगाव येथील प्रसिद्ध श्री मळेकरणी देवी मंदिर मंगळवार दि. २९ सप्टेंबरपासून भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे. मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले असते तारू यात्रेसाठी बंदी घालण्यात आली आहे.
उचगावमधील श्री मळेकरणी देवस्थान नवसाला पावणारे आहे. त्यामुळे या देवस्थानात नेहमीच गर्दी असते. हे देवस्थान खुले करण्यात आले असले तरी गर्दी टाळण्यासाठी अनेक सूचना देण्यात आल्या आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन घोषित करण्यात आल्यानंतर हे देवस्थानही बंद करण्यात आले होते. जवळपास ६ महिन्यांपासून बंद असलेले हे देवस्थान आता उघडण्यात आले आहे.
लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्यात येत असून जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. या पार्श्वभूमीवर सर्व मंदिरे, देवालये सुरु करण्याची मागणी भक्तांच्यावतीने करण्यात येत आहे. या अनुषंगाने सरकारने अनेक मंदिरे उघडण्याचा निर्णय घेतला असला, तरी याठिकाणी केवळ दर्शनासाठी भाविकांना संमती देण्यात आली आहे. प्रसाद, यात्रा अशा प्रकारांवर तूर्तास तरी बंदीच आहे. उचगाव येथील मळेकरणी देवस्थानात देवीचे दर्शन घेण्यासाठी प्रत्येक मंगळवारी आणि शुक्रवारी भाविकांची रीघ असते. त्याचप्रमाणे येथे यात्राही भरते. परंतु कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मळेकरणी देवस्थान कमिटीच्या बैठकीत मंदिर आवारात यात्रेसाठी बंदी घालण्यात आली आहे. भाविकांनी मंदिरात केवळ दर्शनासाठी यायचे असून यात्राच करायची असल्यास प्रसाद घरी नेऊन त्याचे वाटप करावे. याठिकाणी असलेल्या आमराईत नेहमी यात्रा भरविली जाते. परंतु मंदिर आवारात यात्रा करण्यास बंदी असल्याने याठिकाणी यात्रा करण्याऱ्या भाविकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा देवस्थान कमिटीने दिला आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव अजूनही टळला नसून भाविकांच्या हिताच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. परंतु भक्तांच्या वाढत्या मागणीचा विचार करून केवळ देवस्थान दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे. पण यात्रेवर बंदी असेल, याची प्रत्येक भाविकांनी नोंद घ्यावी आणि देवस्थान कमिटीला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.