Monday, February 3, 2025

/

निराधारांचा आधार बनलेल्या कस्तुरी

 belgaum

मातृत्वासोबत कर्तृत्वाला सलाम करण्यासाठी समाजातील नवदुर्गा ‘बेळगाव लाईव्ह’ च्या माध्यमातून प्रकाशझोतात आणत आहोत. नवदुर्गा.. ज्यांनी स्त्री-पुरुष या भेदापलीकडे जाऊन पुरुषाच्या बरोबरीने अनेक क्षेत्रात पुढाकार घेतला आहे.. अशा नवदुर्गांची कहाणी आपण पहात आहोत. आज नवरात्रीची आठवी माळ.. यानिमित्ताने एचआयव्हीग्रस्त निराधार मुलांसाठी कार्यरत असणाऱ्या ‘नंदन मक्कळधामच्या’ कस्तुरी बनगेर यांच्याशी केलेली बातचीत…

आई-वडिलांच्या कुशीत जाते तेच खरे बालपण; परंतु कित्येक बालकांच्या नशिबी असे बालपण येतच नाही. रस्त्याच्या कोपऱ्यावर किंवा कचराकुंडीजवळ फेकून दिलेल्या या निष्पाप कोवळ्या जीवाला मग कुठल्या तरी अनाथाश्रमात स्थान मिळते. तेच त्याचे कुटुंब बनते. अशा अनाथ मुलांना आई-वडिलांच्या प्रेमाची उणीव भासणार नाही, अशा पद्धतीने लळा लावून त्यांचे संगोपन करणाऱ्या अनेक सामाजिक संस्था कार्यरत आहेत. त्यापैकीच एक म्हणजे सदाशिव नगर येथील नंदन मक्कळधाम ही संस्था. आणि या संस्थेत अशा असंख्य निराधारांचा आणि विशेषतः एचआयव्हीग्रस्त मुलांच्या आयुष्याचा आधार बनलेल्या कस्तुरी बनगेर. यांच्या कार्याचे कौतुक करावे तितके कमीच.

सदाशिवनगर येथे गेल्या १३ वर्षांपासून निराधार एचआयव्हीग्रस्त मुलांसाठी त्या झटत आहेत. कस्तुरी बनगेर या स्वतःही एचआयव्ही पॉझिटिव्ह असून त्यांची मुलेही एचआयव्ही पॉझिटिव्ह आहेत. समाजात एचआयव्हीग्रस्तांसाठी अनेक ठिकाणी चुकीचा समाज आहे. शिवाय एचआयव्हीग्रस्तांसाठी वागणूकही वेगळी दिली जाते. परंतु कस्तुरी बनगेर यांच्यासारख्या अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी समाजाचा एचआयव्हीग्रस्तांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलून टाकला आहे. आपल्यालाही समाजातील सर्वसामान्य लोकांप्रमाणे जगण्याचा अधिकार आहे, याची प्रचिती प्रत्येक कार्यातून कस्तुरी बनगेर यांनी दाखवून दिली आहे.

 belgaum

नंदन मक्कळधाम येथे ४० हुन अधिक एचआयव्हीग्रस्त निराधार मुले आहेत. या सर्वांचे संगोपन त्या करतात. त्यांच्या मानसिक गरजांपासून दैनंदिन आयुष्यातील गरजा, शिक्षण या सर्व गोष्टी त्या या आश्रमातील मुलांसाठी पुरवतात. केवळ संगोपनच नाही तर त्यांच्या आयुष्याचा एक भाग म्हणून आणि येथील मुलेच आपले सर्वस्व मानून त्यांचा सांभाळ करतात. या आश्रमात ३ वर्षांपासून ते ३० वर्षांपर्यंतची मुलं-मुली आहेत. या सर्वांशी जिव्हाळ्याचे नाते बनवून कस्तुरी बनगेर यांनी समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे. या मुलांसाठी शैक्षणिक सहली, क्रीडा, योगा, सांस्कृतिक उपक्रम यासह वर्षभरातील प्रत्येक सण या आश्रमात साजरा केला जातो. या आश्रमात प्रत्येक मूल हे निराधार म्हणून आले आहे परंतु या सर्वांसाठी मीच आई आणि मीच वडील, या भूमिकेत त्या प्रत्येक जबाबदारी पार पाडतात, शिवाय हि जबाबदारी सांभाळताना आपल्याला आत्मिक सुख आणि समाधान मिळते आणि दिवसभराचा आनंद या मुलांसोबत घालवून मिळतो, असे त्या सांगतात.Kasturi banger

या आश्रमातील मुलांच्या गरजा या केवळ लोकवर्गणीतून पूर्ण केल्या जातात. आजपर्यंत अनेक मुलांचा सांभाळ या आश्रमाने केला असून त्यापैकी १५ मुलींचे विवाहही करण्यात आले आहेत. विवाह करण्यात आलेल्या मुलींची १५ अपत्येही आहेत. त्यामुळे जावयासह १५ नातवंडाचेही सुख आपल्याला मिळत आहे, असे त्या सांगतात. या अनाथ मुलांना त्यांनी वाढवले, शिक्षण दिले, समाजात स्थान दिले, जगण्याची प्रेरणा दिली.

आज समाजात अनेक वंचित लोक आहेत. लहान मुलांसहित अनेक वृद्धांना आसऱ्याची, मदतीची गरज आहे. समाजात अनेक नागरिक आहेत. परंतु त्यापैकी काहीच जण मदतीसाठी पुढे येतात. स्वतःचे आयुष्य जगण्यासोबतच अशा निराधार आणि वंचितांसाठी आपल्या आयुष्यातील थोडासा भाग खर्च केला, तर आपल्या पदरी पुण्याचं पडेल. स्वार्थ आणि हीन भावना सोडून मानवतेच्या दृष्टिकोनातून समाजातील प्रत्येक अडलेल्या, नडलेल्या आणि गरजूंना सढळ हस्ते मदत करावी. सर्वसामान्य आयुष्य प्रत्येकाकडे नसते. अनेकजण सर्वसामान्य आयुष्यापासून कोसो दूर असतात. अशा लोकांसाठी आपण स्वयंस्फूर्तीने पुढाकार घेऊन सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

Nandan makkal dham
Nandan makkal dham

समाजात मुलगा आणि मुलगी असा भेदभाव न करता समानतेची वागणूक द्यावी, आज ज्या ज्या क्षेत्रात मुले कार्यरत आहेत त्या प्रत्येक क्षेत्रात मुलींनीही आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे. समाजातील वाढत्या स्त्रीभ्रूण हत्या, स्त्रियांवरील अत्याचार हे निंदनीय आहेत. मंदिरातील किंवा देव्हाऱ्यातील देवींची केवळ पूजाच न करता त्यांच्यातील धैर्य, शौर्य आत्मसात करून प्रत्येक स्त्रीने आपल्या संरक्षणासाठी तयार असले पाहिजे, स्वतःचे संरक्षण स्वतः करता येण्यासारखे आपण बलवान झाले पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

असंख्य निराधारांना आपल्या मायेच्या स्पर्शाने, प्रेमाने आपलसं करणा-या कस्तुरी बनगेर यांना त्यांच्या कार्यासाठी ‘बेळगाव लाईव्हचा’ सलाम आणि पुढील कारकिर्दीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा!

-वसुधा कानूरकर-सांबरेकर

 belgaum

1 COMMENT

  1. Hii sir/mam, I’m mahendra sali & I’m live in jalgaon city
    मला एका अनाथ आश्रमातील मुलीशी लग्न करायचं आहे आणि हा माझा व्यक्तिगत निर्णय आहे. अजून माझे लग्न झालेले नाही पण माझी इच्छा आहे की एका अनाथ मुलीला सगळं सुख मिळावं. त्यासाठी मला आपले मार्गदर्शन मिळेल का?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.