बेळगावमध्ये गरजूंच्या मदतीसाठी धावणारी हेल्प फॉर नीडी हि संस्था सातत्याने कार्यरत असून आज एका आजीबाईंना या संस्थेमुळे उर्वरित आयुष्यासाठी आधार मिळाला आहे.
पाटील गल्ली वडगाव येथे गेल्या २ वर्षांपासून भाडे तत्त्वावरील खोलीत राहणाऱ्या सरस्वती खणगावकर या आजीबाई निराधार आहेत. गेल्या २ वर्षांपासून त्या इतरांच्या घरातील घरकाम करून आपला उदरनिर्वाह करत होत्या. लॉकडाऊनच्या कालावधीत या कामाचीही सोय राहिली नाही. त्यामुळे या आजीबाईंसाठी आयुष्य जगणे हे मुश्किल झाले होते. दोन वेळच्या जेवणाचीहि सोय नसल्यामुळे त्यांच्या जीवनाची घडी कोलमडली होती.
यादरम्यान त्यांच्या शेजारी असणाऱ्या गौरव्वा हाजेरी यांनी २ महिने त्यांच्या जेवणाची व्यवस्था केली. त्यांची गरज आणि त्यांची परवड लक्षात घेऊन हेल्प फॉर नीडीच्या माधुरी जाधव यांनी हेल्प फॉर नीडीच्या माध्यमातून सुरेंद्र अनगोळकर यांच्याशी चर्चा करून या आजीबाईंच्या पुढील आयुष्यासाठी एक निर्णय घेण्याचे ठरविले.
विजयनगर येथील डॉ. जयंत पाटील यांच्या सावली वृध्दाश्रमाशी संपर्क साधून या आजीबाईंच्या देखरेखीसाठी विचारणा करण्यात आली. या आजीबाईंच्या देखरेखीसाठी आणि त्यांचा पुढील आयुष्यात सांभाळ करण्यासाठी सावली वृध्दाश्रमाकडून होकार आला.
यामुळे तातडीने हेल्प फॉर निधीचे संस्थापक सुरेंद्र अनगोळकर, माधुरी जाधव, विनय पाटील हे सावली वृध्दाश्रमाचे संस्थापक डॉ. जयंत पाटील यांच्यासह या आजीबाईंच्या घरी पोहोचले. आणि त्यांच्या देखरेखीची जबाबदारी सावली वृध्दाश्रमाला सोपविण्यात आली. निराधार आजींना मिळालेल्या मदतीमुळे हेल्प फॉर नीडी आणि सावली वृध्दाश्रमाच्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.