मच्छे येथे २६ सप्टेंबर रोजी डबल मर्डर प्रकरणाने संपूर्ण शहर हादरले होते. या प्रकरणाचा छडा अवघ्या पाच दिवसात पोलिसांना लावण्यात यश आले असून चार युवकांसह एका महिलेला अटक करण्यात आली आहे. हे खून अनैतिक संबंधातून करण्यात आले असून कल्पना नामक महिलेने प्रियकराचा काटा काढण्यासाठी खुनाचा कट रचला आहे. यामध्ये एकीच्या खुनासह दुसऱ्या मैत्रिणीचा नाहक बळी गेला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी कि, रोहिणी प्रशांत उर्फ गंगाप्पा हुलमनी (वय २३) आणि राजश्री रवी बन्नार (वय २१) या दोघी मैत्रिणी मच्छे येथे काही दिवसांपूर्वी वास्तव्यास आल्या होत्या. मूळच्या काळ्यानहट्टी येथे राहणाऱ्या या दोन्ही महिला अचानकपणे मच्छे येथे आल्या होत्या. दरम्यान दररोज सायंकाळी ४ वाजता फिरण्यासाठी बाहेर पडलेल्या या दोघींचा निर्घृण खून करण्यात आला होता.
यानंतर आरोपी फरार झाले होते. याप्रकरणी रोहिणीचे वडील रामचंद्र मल्लापा कांबळे यांनी बेळगाव ग्रामीण पोलिसात तक्रार दाखल केली होती. या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी ग्रामीण पोलिसांनी ३ विशेष पथकांची स्थापना केली होती. पाच दिवसांच्या तपासात या खून प्रकरणातील आरोपींचा शोध लागला असून आज पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.
कट रचणारी मुख्य महिला आरोपी कल्पना मल्लेश बसरीमरद (वय ३५, रा. काळ्यानट्टी, ता. जी. बेळगाव), तसेच खून करणाऱ्या महेश उर्फ मल्लप्पा मोनाप्पा नाईक (वय २०, रा. सुरते, ता. चंदगड, जी. कोल्हापूर), राहुल मारुती पाटील (वय १९, रा. बेळगुंदी, ता. जी. बेळगाव), रोहित नागाप्पा वड्डर (वय २१, रा. दुर्गामाता कॉलनी, गणेशपूर), शानूर नागाप्पा बन्नार (वय १८, रा. चव्हाट गल्ली, काळ्यानट्टी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
या प्रकरणातील रोहिणीच्या नवऱ्याचे कल्पना या महिलेशी जुने संबंध होते. रोहिणीच्या नवऱ्याने कल्पनाकडून अंदाजे २ ते ३ लाख रुपयांची रक्कम घेतली होती. या दोघांचेही संबंध असताना गंगाप्पा उर्फ प्रशांत हुलमणी याने मागील ७ महिन्यांपूर्वी रोहिणीशी लग्न केले. त्यानंतर रोहिणी ५ महिन्यांची गरोदर होती. शिवाय गंगाप्पा उर्फ प्रशांत याचे यापूर्वीही एक लग्न झाले होते. दरम्यान कल्पना आणि प्रशांतची ओळख वाढली. कल्पनाने वारंवार प्रशांतशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु कोणताही प्रतिसाद प्रशांतने कल्पानाला दिला नाही. आपल्याला फसवून दुसरीही लग्न करण्यात आले याचा राग अनावर होऊन कल्पनाने सुरते येथील आपला नातलग महेश उर्फ मल्लप्पा मोनाप्पा नाईक याच्याशी बातचीत करून कट रचला. जेणेकरून रोहिणीचा काटा काढला तर प्रशांत उर्फ गंगाप्पा पुन्हा आपल्याला भेटेल. यामुळे रोहिणीचा खून करण्याचा कट रचण्यात आला.
या कटात महेश नाईक याने आणखी तिघांना सामील करून घेतले. या खुनाचा कट रचून रोहिणीच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेऊन २६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता मच्छे येथे फिरायला गेलेल्या रोहिणीवर रोहित नागाप्पा वड्डर आणि राहुल मारुती पाटील यांनी डाव साधून चाकूने वार केले. यादरम्यान रोहिणीच्या सोबत असणारी तिची मैत्रीण राजश्री रवी बन्नार हिने सर्व प्रकार पहिला.
आपल्या मैत्रिणीवर हल्ला होत आहे हे बघून ती सोडवायला गेली. आणि वार करणाऱ्या दोघांना तिने पाहिले, याची वाचा फुटू नये यासाठी राहुल आणि रोहित यांनी तिच्यावरदेखील वार करून तिचाही खून केला. या सर्व प्रकरणात राजश्री रवी बन्नार हीच नाहक बळी गेल्याचे सिद्ध झाले आहे.
या प्रकरणाची सखोल चौकशी पोलीस करत असून यापुढील काळातही या प्रकरणाबद्दल अधिक माहिती मिळण्याची शक्यता आहे.