Wednesday, May 8, 2024

/

नुकसान भरपाईसाठी शेतकरी आक्रमक

 belgaum

बेळगांव शहर परिसर आणि तालुक्यातील शेतकऱ्यांची भात पिके अतिवृष्टी आणि करपा रोगाने नष्ट झाल्याने सरकारने नुकसान भरपाई देण्याबरोबरच अतिवृष्टीमुळे घरे पडलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी कर्नाटक राज्य रयत संघ आणि हसिरू सेनेच्या बेळगाव शहर शाखेने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

जिल्हा पंचायत सदस्य रमेश गोरल यांच्या नेतृत्वाखाली आज शुक्रवारी सकाळी उपरोक्त मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. बेळगांव शहर आणि तालुक्यामध्ये अल्पभूधारक शेतकरी असून गेल्या 2019 च्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांना संकटात टाकले होते. त्यावेळी सरकारकडून कोणतीच नुकसान भरपाई अथवा मदत मिळाली नव्हती.

आता पुन्हा 2020 मध्ये अतिवृष्टी आणि करपा रोगाचे संकट शेतकऱ्यांवर कोसळले असून त्यांचे कंबरडे मोडले आहे. परतीच्या पावसामुळे शाबूत असलेली पिके देखील जमीनदोस्त झाल्याने शेतकऱ्यांवर आभाळ कोसळले आहे. सरकारने बेळगांव जिल्हा नुकसानग्रस्त घोषित केला आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना आता ताबडतोब सरसकट एकरी 50 हजार रुपये नुकसान भरपाई मिळावी. त्याप्रमाणे अतिवृष्टीमुळे बऱ्याच शेतकऱ्यांच्या घरांचे नुकसान झाले आहे. अनेक गरीब शेतकरी कुटुंबाला पडक्या घरात जीवन कंठावे लागत आहे. याची प्रामाणिकपणे पडताळणी करून संबंधित शेतकऱ्यांना आर्थिक मदत करून दिलासा द्यावा.Farmers protest

 belgaum

याव्यतिरिक्त शहापूर तलाव आणि वडगांव शिवारातील सरकारी तलावात झालेले अतिक्रमण हटवावे. तसेच या तलावातील गाळ काढून खुदाई करण्याद्वारे पाणीसाठा वाढवावा. परिणामी आसपासच्या शेत जमिनीतील अंतर्जल पातळी वाढेल. तालुक्यातील पिकाऊ जमिनींमध्ये वर्षाकाठी 2 -3 पिके घेतली जातात, तरीदेखील सरकारी सात -बारा उताऱ्यात पडीक जमीन असा जो उल्लेख आहे तो ताबडतोब खोडून पीक पाण्याची जमीन अशी नोंद केली जावी आदी मागण्या जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनात नमूद आहेत.

निवेदन सादर करतेवेळी ,माजी महापौर शिवाजी सुंठकर,प्रदीप देसाई कर्नाटक राज्य रयत संघ हणमंत बाळेकुंद्रीआणि हसिरू सेनेच्या बेळगांव शाखेचे अध्यक्ष बाळेकुंद्री यांच्यासह उपाध्यक्ष राजू मरवे, सेक्रेटरी भोमेश बिर्जे आदींसह बरेच शेतकरी उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.