राष्ट्र ही भाजप आणि योगी आदित्यनाथ यांची खाजगी मालमत्ता नाही. बलात्कार -हत्या प्रकरणातील पीडित मुलीच्या पालकांना भेटण्यास जाणाऱ्या राहुल गांधी यांना रोखण्याचा त्या “योगी की रोगी” ला कोणताही अधिकार नव्हता, अशा शब्दात माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर कडाडून टीका केली.
शहरातील आरटीओ सर्कल नजीकच्या नूतन काँग्रेस भवनाच्या उद्घाटनासाठी शुक्रवारी सकाळी सांबरा विमानतळावर दाखल झालेल्या विरोधी पक्ष नेते व माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पत्रकारांशी बोलताना उपरोक्त टीका केली.
योगी आदित्यनाथ यांचे उत्तर प्रदेशातील सरकार कायदा आणि सुव्यवस्था पायदळी तुडवत आहे. त्यांच्या जंगल राज्यामध्ये कायदा नावाची चीज राहिलेले नाही.
पोलीस हे सार्वभौम असल्याप्रमाणे वागतात. राहुल गांधी यांना रोखण्याचे आदेश देणाऱ्या योगी आदित्यनाथ यांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणीही सिद्धरामय्या यांनी केली.
राज्यातील पूरग्रस्तांना अद्यापपर्यंत घरे आणि मदत निधी मिळाला नसल्याबद्दल त्यांनी राज्य सरकारवर देखील कडाडून टीका केली. पूरग्रस्तांसाठी अद्याप एक नवा पैसा देखील खर्च करण्यात आला नसल्याचे त्यांनी सांगितले. कोव्हीड-19 साहित्य खरेदीमध्ये मोठ्या प्रमाणात लाचखोरी झाली असल्याचा आरोप त्यांनी केला.
कोव्हीड-19 साहित्याच्या 4 हजार कोटी रुपयांच्या खरेदीमध्ये 2 हजार कोटींची लाचखोरी झाली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्यावर टीका करताना येडियुरप्पा हे धनादेशाद्वारे आणि त्यांचे नातू आरटीजीएसद्वारे लाच स्वीकारतात असा आरोपही माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केला