दसरोत्सवात श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानतर्फे दरवर्षी बेळगांव शहर व परिसरात भव्य अशी श्री दुर्गामाता दौड काढण्यात येते. मात्र यंदा कोरोना प्रादुर्भावामुळे आयोजकांना औपचारिकता पाळावी लागली आणि दौडच्या 23 वर्षाच्या इतिहासात प्रथमच आज शनिवारी पहिल्या दिवशी फक्त सहा धारकरी दौंडमध्ये धावले.
देव, देश आणि धर्माच्या रक्षणासाठी तर वर्षी बेळगाव शहर व परिसरात शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे भव्य अशी दुर्गामाता दौड काढण्यात येते तथापि यावर्षी पुरवण्याचे संकट असल्यामुळे साध्या पद्धतीने दुर्गामाता दौडचे आयोजन करण्यात आले आहे त्यानुसार आज शनिवारी श्री दुर्गामाता दौडच्या पहिल्या दिवशी प. पू. भगव्या ध्वजासह फक्त पाच शस्त्रधारी दौंडमध्ये धावले. शहापूर छ. शिवाजी उद्यान येथे आज पहाटे प्रारंभी श्री. छत्रे गुरुजींच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्याचे पूजन करून ध्वज चढवण्यात आला यावेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे जिल्हाध्यक्ष किरण गावडे यांच्या हस्ते आरती झाली. याप्रसंगी शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे तालुकाप्रमुख परशुराम कोकितकर, विशाल चौगुले, विजय कुंटे आदी उपस्थित होते. आरती झाल्यानंतर छ. शिवाजी महाराजांना वंदन करून प्रेरणा मंत्राने दौंडला प्रारंभ झाला.
आजच्या पहिल्या दिवशीच्या श्री दुर्गामाता दौडची छ. शिवाजी उद्यान येथून प्रारंभ होऊन एसपीएम रोडमार्गे दक्षिण काशी कपलेश्वर मंदिर येथे सांगता झाली. श्री कपिलेश्वर मंदिर येथे प्रमुख पाहुणे खडेबाजार पोलिस स्थानकाचे सीपीआय धीरज शिंदे हे यांच्या हस्ते ध्वज उतरविण्यात आला त्यानंतर ध्येय मंत्राने पहिल्या दिवशीच्या दौऱ्याची सांगता झाली याप्रसंगी शिवप्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष किरण गावडे, तालुकाप्रमुख परशराम कोकितकर, शहर प्रमुख अजित जाधव, कार्यवाह विश्वनाथ पाटील, विभाग प्रमुख अनंत चौगुले, विशाल चौगुले, विजय कुंटे आदी उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना जिल्हाध्यक्ष किरण गावडे म्हणाले की शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान चे प्रमुख संभाजी भिडे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या तेवीस वर्षांपासून बेळगाव शहर परिसरात भव्य अशी श्री दुर्गामाता दौड आयोजित केली जाते. मात्र यावर्षी कोरोना प्रादुर्भावाच्या संकटामुळे सरकारी नियमांचे पालन करून परंपरा खंडित होऊ नये यासाठी औपचारिकता म्हणून साध्या पद्धतीने ही दौड काढण्यात येत आहे. यंदा दररोज फक्त सहा धारकरी या दौडमध्ये हे धावत असून हा मान शिवप्रभू दौडमधील पहिल्या सहा क्रमांकाच्या विजेत्यांना देण्यात आला असल्याचे गावडे यांनी सांगितले. तसेच यंदा साधेपणाने श्री दुर्गामाता दौड काढण्यात येत असली तरी शिवप्रेमींनी दरवर्षीप्रमाणे सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी केले.
दरवर्षी भिडे गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली आणि किरण गावडे यांच्या नेतृत्वाखाली शहरात दुर्गामाता दौड काढली जाते. भगवे फेटे व पांढरी टोपी घालून हजारोच्या संख्येने युवक दुर्गामाता दौडमध्ये सहभागी होत असतात. परंतु यावर्षी हे चित्र पहावयास मिळाले नाही. पोलीस बंदोबस्तात मोजकेच धारकरी ध्वज व शस्त्रे घेऊन दौडीच्या मार्गावर धावताना पाहून दरवर्षी ही दौड पाहणाऱ्यांना चुकल्या चुकल्यासारखे वाटत होते. आज पहिल्या दिवशीची दौड साधेपणाने झाली असली तरी कार्यकर्त्यांमध्ये दरवर्षीप्रमाणेच उत्साह पहावयास मिळत होता.