बेळगांव जिल्हा सहकारी केंद्र बँक अर्थात डीसीसी बँकेच्या निवडणुकीत खानापुर मतदारसंघांतील म. ए. समितीचे माजी आमदार अरविंद पाटील यांच्या विरोधात काँग्रेसच्या विद्यमान आमदार अंजली निंबाळकर यांनी दंड थोपटण्याचा निर्णय घेतल्यामुळे या उभयतांमधील शीतयुद्ध पुन्हा एकदा भडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
माजी आमदार अरविंद पाटील आणि विद्यमान आमदार अंजली निंबाळकर यांच्यातील शत्रुत्व जगजाहीर आहे. यापूर्वी अनेक वेळा या उभयतांनी सार्वजनिक ठिकाणी मिळालेली एकमेकांना नांव ठेवून तिरस्कार करण्याची एकही संधी सोडलेली नाही. गेल्या जानेवारी 2018 मध्ये मान (ता. खानापूर) गावामध्ये एका कार्यक्रमादरम्यान तत्कालीन आमदार अरविंद पाटील यांनी व्यासपीठावर बोलत असलेल्या अंजली यांच्या हातातून माईक हिसकावून घेतला होता. गणेश उत्सवात आपले योगदान काय होते? असा प्रश्न अंजली यांनी विचारल्यानंतर ही घटना घडली होती. या घटनेनंतर पाटील आणि निंबाळकर यांच्यात वितुष्ट निर्माण होऊन त्यांनी एकमेकांवर आरोप -प्रत्यारोपाला सुरुवात केली होती.
कालांतराने त्याच वर्षी अरविंद पाटील यांच्याविरुद्ध खानापूर विधानसभा मतदार संघातून अंजली निंबाळकर या निवडणुकीत उभ्या राहिलेल्या आणि त्यांनी 36 हजार 649 मताधिक्क्याने विजय संपादन केला, तर अरविंद पाटील 26 हजार 613 मते मिळवून चौथ्या स्थानावर फेकले गेले. थोडक्यात निंबाळकर यांच्यापेक्षा पाटील यांना जवळपास 10 हजार मते कमी पडली. परंतु या उभयतांमध्ये शत्रुत्व त्यावेळी समाप्त न होता एकमेकांवरील आरोप-प्रत्यारोपांमुळे उलट वाढतच गेले.
सध्या अरविंद पाटील हे आमदार नसले तरी डीसीसी बँकेवर ते 5 वेळा निवडून आले आहेत. यासाठीच सदर बँकेच्या निवडणुकीत उभे राहून अरविंद पाटलांचे राजकीय अस्तित्व संपविण्यासाठी आमदार अंजली निंबाळकर सिद्ध झाल्या असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले.
विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, म. ए. समितीचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार दिगंबर पाटील यांनी डीसीसी बँकेच्या निवडणुकीत अरविंद पाटील यांच्याविरुद्धच्या लढ्यात अंजली निंबाळकर यांना पाठिंबा दर्शविला आहे. म. ए. समिती नेत्यांमध्ये मतभिन्नता असल्यामुळे दिगंबर पाटलांना हा निर्णय घ्यावा लागला असल्याचे बोलले जाते. ते स्वतः देखील डीसीसी बँक निवडणुकीची उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुक आहेत. अरविंद पाटील हे माजी मंत्री उमेश कत्ती गटाचे प्रतिस्पर्धी असलेल्या लक्ष्मण सवदी गटाचे सदस्य आहेत. डीसीसी बँकेच्या निवडणुकीत पक्षीय राजकारणाला थारा नसल्यामुळे येथे काँग्रेस आणि भाजप यांच्यातील स्पर्धा उपयोगाची नाही यासाठी कत्ती यांच्या निर्णयावर सवदी यावेळी मौन पडण्याची शक्यता असल्याचेही सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, आमदार अंजली निंबाळकर यांच्याशी माध्यमांनी संपर्क साधला असता डीसीसी बँकेची निवडणूक कोणी लढवायची याबाबत अद्याप निर्णय झाला नसल्याचे त्यांनी सांगितले. मी किंवा इतर कोणी नव्हे तर खुद्द मतदार आणि बेळगांवातील नेतेमंडळी निवडणुकीचा उमेदवार निश्चित करतील. यासंदर्भात चर्चा सुरू असून लवकरच निर्णय घेतला जाईल आणि उमेदवारी जाहीर करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
माजी आमदार अरविंद पाटील हे 2005 पासून आजतागायत डीसीसी बँकेचे लोकनियुक्त सदस्य असून त्यांनी आर्थिक दृष्ट्या खानापूर तालुक्यात अनेक बदल केले आहेत. गेल्या 2005 सालापासूनच्या आपल्या अधिकार पदाच्या कालावधीत आपण डीसीसी बँकेकडून खानापूर तालुक्यातील को -ऑपरेटिव्ह सोसायट्यांना सुमारे 9.25 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. याद्वारे होणारी 113 कोटींची उलाढाल अनेक लोकांना विशेष करून शेतकऱ्यांसाठी आर्थिक बळ देणारी ठरत असल्याचे अरविंद पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
याव्यतिरिक्त खानापूर तालुक्यातील को -ऑपरेटिव्ह सोसायट्यांची संख्या वाढली असून पर्यायाने रोजगारही वाढला आहे, शिवाय आर्थिक उलाढाल वाढल्यामुळे तालुक्याची आर्थिक स्थिती झपाट्याने सुधारत आहे. मतदारांना माझे काम चांगलेच माहित आहे. त्यामुळे डीसीसी बँकेच्या आगामी निवडणुकीत माझा विजय तेच ठरवतील इतर कोणी नाही, असेही अरविंद पाटील यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.