सीमाभागातील मराठी जनता १ नोव्हेंबर हा काळा दिन म्हणून पाळते. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काळ्या दिनी कोणत्याही कारणास्तव परवानगी दिली जाणार नाही, अशी सूचना जिल्हाधिकारी महांतेश हिरेमठ यांनी दिली आहे. याप्रमाणेच राज्योत्सवदेखील अत्यंत साधेपणात साजरा करण्याचे आदेश बजावण्यात आले आहेत.
१ नोव्हेंबर रोजी कर्नाटक राज्योत्सव दिन असतो.यासंदर्भात शनिवारी बेळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयात पूर्वतयारीसाठी प्राथमिक बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी कर्नाटक राज्योत्सवादिवशी केवळ भुवनेश्वरी देवीची पूजा केली जाईल, मात्र मिरवणुकीला कोणत्याही परिस्थितीत परवानगी दिली जाणार नाही, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
बैठकीच्या प्रारंभी दिवंगत मान्यवरांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यादरम्यान विविध कन्नड संघटनांचे नेते उपस्थित होते. कन्नड संघटनांच्या नेत्यांनी काळ्या दिनी बेळगावमध्ये काढण्यात येणाऱ्या मूक मोर्चाला आक्षेप घेतला. आणि काळ्या दिनासाठी परवानगी देण्यात येऊ नये, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांना केली. कन्नड रक्षण वेदिकेचे जिल्हाध्यक्ष दीपक गुडगनट्टी यांनी मराठी माणसांना काळ्या दिनाची परवानगी न देण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. त्याचप्रमाणे या बैठकीत पिरनवाडीच्या संगोळी रायन्ना पुतळ्यावरून पुन्हा विषय मांडण्यात आला असून या चौकाचे नाव संगोळी रायन्ना सर्कल असे ठेवावे, अशी मागणीही काही कन्नड नेत्यांनी केली.
यावेळी जिल्हाधिकारी महांतेश हिरेमठ म्हणाले कि, सध्या कोविड रुग्णांच्या संख्येत घट आहे. प्रति १०० रुग्णांमागे ५ रुग्ण कोविड पॉझिटिव्ह येत असून दररोज सुमारे तीन हजार चाचण्या घेतल्या जात आहेत. अजूनही बाजारात लस उपलब्ध झाली नसून मास्क वापरणे अनिवार्य असल्याची घोषणा जागतिक आरोग्य संघटनेने केली आहे. कोविड समस्या अजूनही गंभीर असून यंदाच्या राज्योत्सव मिरवणुकीला परवानगी देण्यात आली नसल्याचे त्यांनी सांगितले. शिवाय यंदाचा राज्योत्सव साधेपणात साजरा करण्यात येणार असून विद्यार्थी या राज्योत्सवात सहभागी होणार नाहीत. केवळ पोलीस, अग्निशामक दल, होमगार्ड्ससह १० ते १२ घटक गणवेशामध्ये हजर राहणार आहेत, अशी सूचना जिल्हा पालकमंत्र्यांनी केली आहे. त्याचप्रमाणे सांस्कृतिक कार्यक्रमही रद्द करण्यात आले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.
यावेळी पोलिस आयुक्त डॉ. के. त्यागराजन जि. पं. अध्यक्षा आशा ऐहोळे, आदींसह इतर उपस्थित होते.