बेळगावच्या राणी चन्नम्मा विश्वविद्यालयामध्ये सुवर्ण पदक मिळवण्यासाठी पैशांची मागणी करण्यात आल्याची तक्रार विद्यार्थिनीच्या पालकांनी केली असून हा विषय चर्चेचा ठरत आहे. यासंदर्भात संबंधित विद्यार्थिनीच्या पालकांनी राज्यपाल तसेच पंतप्रधानांकडे तक्रार केली आहे.
राणी चन्नम्मा विद्यापीठाचा आठवा दीक्षांत समारंभ नुकताच पार पडला. या दीक्षांत समारंभात सुवर्ण पदक देऊन उत्कृष्ट कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांना गौरविण्यात येते. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा मोजक्याच विद्यार्थ्यांना सुवर्ण पदक देऊन गौरविण्यात आले. राणी चन्नम्मा विद्यापीठात बीए मध्ये गुन्हेगारी आणि गुन्हेगारीचे न्याय या विषयात शिक्षण घेणाऱ्या सृष्टी अमरेंद्र ज्ञानी या विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक मिळविला आहे. दीक्षांत समारंभात तिचा गौरव होणे अपेक्षित होते.
यासंदर्भातील पत्रही विद्यापीठाकडून आले होते. परंतु दीक्षांत समारंभात केवळ एकच सुवर्ण पदक वितरित करण्यात आले. उर्वरित पदके दीक्षांत समारंभानंतर वितरित करण्यात येतील, अशी सूचना विद्यापीठाने दिली होती. त्यानंतर सुवर्णपदकाची मागणी करण्यात आली असता एक हजार रुपयाच्या डी. डी. ची मागणी करण्यात आली. हा विद्यार्थ्यांवरील अन्याय आहे. विद्यापीठाकडून मिळणाऱ्या अशा वागणुकीमुळे कुलगुरू रामचंद्रगौड यांनी राजीनामा देण्याची मागणी करण्यात आली आहे.
यासंदर्भात संबंधित विद्यार्थिनी सृष्टी अमरेंद्र ज्ञानी हिच्याशी बातचीत केली असता, राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या आठव्या दीक्षांत समारंभात सुवर्ण पदक कोणत्याही विद्यार्थ्याला देण्यात आले नसल्याचे तिने सांगितले. हा प्रतिभावंत विद्यार्थ्यांना अपमान असल्याचे मत तिने व्यक्त केले.
याबाबतीत कुलगुरूंना विचारले असता, डीडी काढल्याशिवाय पदक मिळणार नसल्याचे सांगण्यात आले. कोणतीही कायदेशीर कारवाई करा, परंतु पदक मिळणार नाही, अशी बेजबाबदारीची उत्तरे देण्यात आल्याचा आरोप या विद्यार्थिनीने केला आहे. त्यामुळे आता कायदेशीररित्या आपण पदक मिळवू अशी, माहिती तिने दिली आहे.