हवाई वाहतूक तपशिलानुसार गेल्या ऑगस्ट महिन्यात बेंगलोर आणि मंगळूरनंतर बेळगांव विमानतळ हे राज्यातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात व्यस्त विमानतळ ठरले आहे.
गेल्या ऑगस्ट महिन्यात राज्यात तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या बेळगावने हा क्रमांक पुढील महिन्यात देखील कायम राखला आहे. कोणतीही एअरबस अथवा बोईंग विमान सेवा नसताना बेळगांव विमानतळाने हस्तगत केलेले तिसरे स्थान अत्यंत आश्वासक म्हणावे लागेल.
गेल्या सप्टेंबर महिन्यात बेंगलोर सर्वाधिक प्रवासी संख्येसह अग्रस्थानी होते. त्याच्यामागोमाग मंगळूर, बेळगांव, हुबळी, कलबुर्गी, म्हैसूर, विजयनगर (बेळ्ळारी), आणि बिदर यांचा क्रमांक लागतो.
कोरोना संसर्गजन्य परिस्थिती आणि लॉकडाऊननंतर देशातील विमानतळे खुली झाली असली तरी बेळगांवहून सुरू झालेल्या हवाई वाहतुकीत लक्षणीय वाढ झाली आहे. आता बहुतांश विमान कंपन्यांनी (एअरलाईन्स) आपल्या पूर्व कोविड वेळापत्रकाची अंमलबजावणी सुरू केली आहे.
कर्नाटकातील विमान विमानतळांवरील गेल्या सप्टेंबर महिन्यातील प्रवासी आणि विमानांची ये-जा यांची आकडेवारी (अनुक्रमे प्रवाशांची संख्या, विमानांची येजा आणि एप्रिल ते सप्टेंबर 2020 दरम्यानची प्रवासी संख्या यानुसार) खालीलप्रमाणे आहे.
बेंगलोर : सप्टेंबर महिन्यातील प्रवासी संख्या 8,55,801, विमानांची ये -जा 9,753, एप्रिल ते सप्टेंबर दरम्यान एकूण प्रवासी संख्या 18,57,608. मंगळूर : सप्टेंबर महिन्यातील प्रवासी संख्या 34,173, विमानांची ये -जा 385, एप्रिल ते सप्टेंबर दरम्यान एकूण प्रवासी संख्या 74,159. बेळगांव : सप्टेंबर महिन्यातील प्रवासी संख्या 23,170, विमानांची ये -जा 511, एप्रिल ते सप्टेंबर दरम्यान एकूण प्रवासी संख्या 65890. हुबळी : 5687/147/9074. कलबुर्गी (गुलबर्गा) : 5541/122/17944. म्हैसूर : 3882/238/13385. बेळ्ळारी (विजयनगर) : 744/32/7,481. बिदर : 830/10/4334.