अद्ययावत तंत्रज्ञानामुळे जीवन सुसह्य करण्यासाठी सर्व गोष्टींमध्ये बदल केले जात असले तरी सोन्याची “गुंडगडगी” हे अभूषण तयार करण्याच्या कलेमध्ये मात्र कोणताही बदल झालेला नाही हे विशेष होय. आज देखील कांही दुर्मिळ सोनारांकडेच हाताने बनविलेल्या गुंडगडगी मिळतात.
आज-काल सर्रास अद्यावत मशीनद्वारे सोने व चांदीचे दागिने बनविले जातात जे दिसायला मोहक असतात. या अद्ययावत तंत्रज्ञानामुळे गेल्या दोन दशकात अनेक सोनार नाउमेद होऊन रस्त्यावर आले आहेत. कारण अद्ययावत मशीनद्वारे बनविलेले दागिने आकार मानाने कमी वजनाचेतर असतातच शिवाय त्यांच्यामध्ये शुद्धता आणि भपकेबाजपणा जपला जातो. परंतु ही गोष्ट सोनार व्यवसाय करणाऱ्या शिवानंद जगन्नाथ हुबळी यांना मान्य नाही. जेड गल्ली शहापूर येथील रहिवासी असणारे शिवानंद हे देशातील असे दुर्मिळ सोनार आहेत की जे मशीनचा कमीत कमी वापर करून सोन्याच्या गुंडगडगी तयार करतात.
गुंडगडगी बनवण्याचे आपले 95 टक्के काम हे हाताच्या कौशल्यावर असते असे त्यांनी सांगितले. घरातील आपल्या कार्यशाळेच्या जमिनीवर तासंतास बसून शिवानंद सोन्याच्या तुकड्यांना ठोकून आवश्यक मापात आकार देऊन गुंडगडगी तयार करतात. फक्त सोन्याच्या तुकड्यांचे पत्रे (प्लेट्स) तयार करण्यासाठी आणि तार ओढण्यासाठी ते मशीनची मदत घेतात. चांदीच्या गुंडगडगी बनवण्यासाठी आजकाल अनेक सोनार 90 टक्के मशीनचा आणि 10 टक्के हाताचा वापर करतात, असे शिवानंदन यांनी सांगितले. सोन्याच्या गुंडगिरी बनविणारे कांही सोनार देखील मशिनचा वापर करतात. परंतु त्यांचे फिनिशिंग वर्क हाताने बनवलेल्या गुंडगडगी इतके अचूक नसते यासाठी हाताने बनविलेल्या गुंडगिरी मौल्यवान असतात, असेही शिवानंद यांनी स्पष्ट केले.
शिवानंदन यांनी तयार केलेल्या गुंडगडगी देशातील कर्नाटकसह आंध्र प्रदेश, महाराष्ट्र आणि गोवा राज्यात नावाजल्या जातात. त्यांचे बहुतांश ग्राहक हे दागिन्यांचे दुकानदार असून ते शिवानंद यांच्याशी संपर्क साधून गुंडगडगीची ऑर्डर देतात आणि त्यासाठी आवश्यक कच्च्या सोन्याचे तुकडे पुरवितात. शिवानंद यांनी त्या तुकड्यांपासून गुंडगडगी तयार करून दिल्यानंतर ग्राहक त्यांना पैसे देतात.
सर्वसामान्यपणे लिंगायत समाज बांधव ज्या गुंडगडगी परिधान करतात त्या चांदिच्या असतात, परंतु श्रीमंत भक्त आणि खासकरून स्वामीजी ही मंडळी सोन्याची गुंडगडगी परिधान करणे पसंत करतात. या मंडळींची संख्या कमी असली तरी हाताने सोन्याच्या गुंडगडगी बनविणारा कारागिरांची कमतरता असल्यामुळे शिवानंद यांना मोठ्या प्रमाणात ऑर्डरी मिळत असतात.
“गुंडगडगी” म्हणजे लिंगायत समाज बांधवांच्या गळ्यातील अभूषण होय. लिंगायत समाज हा कट्टर शिवभक्त असून त्यांच्या प्रत्येक समाजबांधवाकडे इष्टलिंग असते जे गुंडगडगीमध्ये ठेवलेले असते. ही गुंडगडगी अत्यंत पवित्र आणि धार्मिक मानली जाते. गुंडगडगीमध्ये शिवापुरीमठ, देवगिरीमठ, ईश्वरकाई, लिंगायतकाई आणि चौका असे पाच प्रकार आहेत. या प्रकारानुसार प्रत्येक गुंडगडगीची रचना (डिझाईन) वेगळी असते, अशी माहितीही शिवानंद हुबळी यांनी दिली.
हुबळी घराण्याच्या तीन पिढ्या हाताने सोन्याच्या गुंडगडगी बनविण्याचा व्यवसाय करत आहेत. शिवानंद यांची ही तिसरी पिढी आहे. करवीरप्पा विराप्पा हुबळी या शिवानंद यांच्या आजोबांनी हा व्यवसाय सुरू केला. त्यानंतर त्यांचा मुलगा जगन्नाथ आणि आता नातू शिवानंद यांनी हाताने सोन्याच्या गुंडगडगी बनविण्याचा हा व्यवसाय पुढे सुरु ठेवला आहे.