मातृत्वासोबत कर्तृत्वाला सलाम करण्यासाठी समाजातील नवदुर्गा ‘बेळगाव लाईव्ह’ च्या माध्यमातून प्रकाशझोतात आणत आहोत. नवदुर्गा.. ज्यांनी स्त्री-पुरुष या भेदापलीकडे जाऊन पुरुषाच्या बरोबरीने अनेक क्षेत्रात पुढाकार घेतला आहे.. अशा नवदुर्गांची कहाणी आपण पहात आहोत. आज नवरात्रीची सहावी माळ.. यानिमित्ताने बेळगावमधील कडोली गावातून लष्करात भरती झालेली एक तरुणी.. सैनिक राणी मायाण्णा यांच्याशी केलेली बातचीत…
एक काळ असा होता की, जेव्हा महिला फक्त घरातील कामकाज आणि मुलांचे पालन-पोषण एवढच काम करीत असत. पण आता ही परीस्थिती बदलेली दिसून येते. स्वातंत्र्यच्या लढाईपासूनच महिलाचा सहभाग दिसून येतो. कोणतेही क्षेत्र असो. महिलांचे योगदान हे असतेच . शिक्षण, समाजकार्य, खेळ, व्यापार, संगीत अशा अनेक क्षेत्रांमध्ये महिला उल्लेखनीय कामगिरी करीत आहेत. भारतीय लष्करात लष्करात पुरुषांच्या बरोबरीने आज अनेक महिला सैन्यदलात कार्यरत आहेत. बेळगावच्या तालुका भागातील कडोली या गावातील राणी परशराम मायाण्णा ही तरुणी वयाच्या अवघ्या १८ वर्षांपासून भारतीय सैन्य दलात कार्यरत आहे.
भारतीय लष्करात महिलांना वरिष्ठ पदावर स्थान नव्हते. परंतु हे स्थान मिळण्यासाठीची एक मोठी लढाई महिलांनी सर्वोच्च न्यायालयात जिंकली. आणि बघता बघता भारतीय सैन्यदल, हवाईदल, नौदलासारख्या अनेक सैन्यदलात महिलांचा सहभाग वाढू लागला. भारताच्या गुप्तचर यंत्रणेपासून ते अंतराळ प्रशिक्षण केंद्रातही महिलांचा लक्षणीय सहभाग दिसून येत आहे. भारतीय लष्करात महिलांना कर्तृत्व दाखवण्याची संधी मिळते. अशक्य ते साध्य करण्याचे आव्हान महिला झेलत आहेत. त्यापैकीच एक म्हणजे राणी मायाण्णा.
घराच्या चार भिंतीपलीकडे बाहेर न पडणारी स्त्री सातासमुद्रापलीकडे पोहोचली आहे. आपल्या कर्तृत्वाचा डंका जगभर गाजवत आहे. कडोली येथील राणी मायाण्णाचे हि तरुणी शालेय पातळीपासूनच देशप्रेमी आहे. शाळेपासून भारतीय सैन्य दलाचा आदर्श बाळगणारी हि तरुणी वयाच्या १८व्या वर्षी सैन्य दलात भरती होण्याची स्वप्न पाहू लागली. आणि त्याप्रमाणे जिद्दीने या तरुणीने भारतीय सैन्य दलात प्रवेश मिळविला. अर्थातच तिचे वडील परशराम मायाण्णा यांचा तिला भरघोस पाठिंबा मिळाला. यासोबतच संपूर्ण कुटुंब तिच्या पाठीशी उभे राहिले. सातवीत असताना देशसेवेसाठी आपण झटावे हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन आपले करियर क्षेत्र हे सैन्यदलच असावे असा ठाम निश्चय या तरुणीने केला.
सैन्यदलात भरती होण्यापूर्वी पदवीपूर्ण शिक्षण संपूर्ण करून त्यानंतर पदवीपर्यंतचे शिक्षण भारतीय सैन्य दलात या तरुणीने केले आहे. सीआरपीएफ दलात सेवा बजाविणारी राणी मायाण्णा ही तरुणी काश्मीर येथे कार्यरत आहे. काश्मीरमध्ये ३७० कलम हटविण्यात आला त्या दरम्यान काश्मीरमध्ये सेवा बजाविताना तणावपूर्ण वातावरणात देशासाठी आपण सेवा करण्याचे समाधान मिळाले असे तिने सांगितले. बारामुल्ला काश्मीर येथे जनरल ड्युटीवर असताना दगडफेकीचे प्रसंग अनेकवेळा होतात. परंतु सैन्यदलात असे प्रसंग हाताळण्यासाठी संपूर्ण तयार करून घेतले जाते. सीआरपीएफ दलात सेवा बजाविण्यासाठी राणी मायाण्णा या तरुणीने शस्त्रास्त्र वापरणेही अवगत केले आहे. महिला म्हणून कार्य करताना कोणतीही अडचण येत नाही. वरिष्ठ अधिकारी अनेक सूचना देतात. विविध परिस्थिती हाताळण्यासाठी प्रशिक्षण देतात. शिवाय आपल्याला भारतीय सैन्यदलात उच्च पातळीवर काम करून प्रगती करायची आहे, असे तिने सांगितले.
भारतीय सैन्य दलात म्हणावी तितकी महिलांची संख्या नाही. सैन्यदलात भरतीसाठी स्त्रियांनी विशेषतः तरुणींनी हिरीरीने सहभाग घ्यावा, भारतातील प्रत्येक स्त्रीने देशासाठी, देशसेवेसाठी पुढाकार घ्यावा. कुटुंबाव्यतिरिक्त बाहेरच्या जगाचा अनुभव घ्यावा, स्वतःचे संरक्षण स्वतः करावे, आणि शिक्षणात कोणत्याही कारणास्तव मागे राहू नये असे तिने सांगितले. शिवाय आर्थिकरित्या सक्षम होण्यासाठी स्वतःच्या पायावर स्वतः उभा राहण्यासाठी प्रत्येक मुलीने पुढाकार घेतला पाहिजे. केवळ स्वतःचे संरक्षण नाही तर आपल्या अवतीभवती होणाऱ्या अन्याय – अत्याचारावर आवाज उठविला पाहिजे. ठामपणाने आपली मते पटवून देण्यासाठी सक्षम झाले पाहिजे, स्वकर्तृत्व जगासमोर आणावे, असे मत तिने ‘बेळगाव लाईव्ह’शी बोलताना व्यक्त केले.
वयाच्या अवघ्या १८ व्य वर्षी देशसेवेची आस ठेवलेल्या राणी मायाण्णा हिच्या सैन्य दलातील कार्यासाठी सलाम आणि पुढील आयुष्यासाठी ‘टीम बेळगाव लाईव्ह’ च्या खूप साऱ्या शुभेच्छा!
-वसुधा कानूरकर सांबरेकर