बेळगाव बार असोसिएशनचे नवनिर्वाचित अध्यक्ष ॲड. दिनेश पाटील यांची निवड कायद्याला धरून नसल्यामुळे त्यांचे अध्यक्षपद तात्काळ रद्द करून नव्याने अध्यक्षपदाची निवडणूक जाहीर करावी, या मागणीसाठी वकिलांनी आज बुधवारी न्यायालयासमोर धरणे आंदोलन छेडले.
बेळगाव बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष एस. एस. किवडसण्णावर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन छेडण्यात आले होते. बेळगांव बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी झालेली ॲड. दिनेश पाटील यांची निवड ही बेकायदेशीर आहे. तेंव्हा त्यांची ही निवड त्वरित रद्द करावी.
तसेच चुकीच्या पद्धतीने परस्पर अध्यक्षपदाची निवड प्रक्रिया पार पाडण्यास कारणीभूत असलेल्या सरचिटणीस ॲड. आर. सी. पाटील यांनाही त्यांच्या पदावरून कमी करावे अशी मागणी आंदोलनकर्त्या वकिलांनी केली आहे.
बार असोसिएशनच्या सदस्यांना माहित नसताना परस्पर मॅनेजिंग कमिटीने अध्यक्षपदाची निवड करून समस्त वकिलांचा अपमान केला आहे. केव्हा नूतन अध्यक्षांची निवड बेकायदेशीर असल्यामुळे नव्याने अध्यक्षपदाची निवडणूक घेण्यात यावी अशी मागणी वकिलांनी केली आहे .न्यायालय आवारात छेडण्यात आलेल्या या धरणे आंदोलनात ॲड किवडसण्णावर यांच्यासह बहुसंख्य वकील सहभागी झाले होते.