Sunday, April 28, 2024

/

हवालदार शिवाजी तळवार यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

 belgaum

दावणगिरीनजीक अपघाती निधन पावलेले लष्करी जवान आणि नावगे (ता.बेळगांव) गांवचे सुपुत्र शिवाजी आनंद तळवार यांच्यावर मंगळवारी दुपारी गावानजीकच्या स्मशानभूमीमध्ये शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

भारतीय लष्करात 19 वर्षे सेवा बजावणारे शिवाजी आनंद तळवार राजस्थान येथे सेवा बजावत असताना त्यांना हवालदार पदी बढती मिळाली होती. गेल्या महिन्याभरापूर्वी ते आपल्या मूळगांवी नावगे येथे सुट्टी निमित्त आले होते. गेल्या रविवारी ते दुचाकीवरून निघाले असता रात्री 8 च्या दरम्यान दावणगिरी जवळ मालवाहू जेसीबी ट्रकने समोरून धडक दिल्यामुळे शिवाजी यांचे घटनास्थळीच निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच तळवार कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला तर नावगे पंचक्रोशीमध्ये शोककळा पसरली आहे.Military

नावगे गांवात त्यांचे पार्थिव आणल्यानंतर आज मंगळवारी सकाळी फुलांनी सजविलेल्या वाहनावरून शिवाजी आनंद तळवार यांची गावापासून स्मशानभूमीपर्यंत भव्य अंत्ययात्रा काढण्यात आली. तत्पूर्वी गावच्या बस थांब्यानजीक खास उभारण्यात आलेल्या शामियानामध्ये शिवाजी यांचे पार्थिव कांही काळ अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. यावेळी गावातील ग्रामपंचायत सदस्य, पंचमंडळी -प्रतिष्ठित नागरिक, पोलीस व प्रशासकीय अधिकारी तसेच लष्करी अधिकाऱ्यांनी पुष्पहार व पुष्पचक्र वाहून दिवंगत शिवाजी तळवार यांना श्रद्धांजली अर्पण केली.

 belgaum

दिवंगत शिवाजी यांच्या पार्थिवाचे दर्शन घेताना यांच्या आई आणि पत्नीने एकच हंबरडा फोडला. त्यांचे अनावर झालेले दुःख पाहून उपस्थितांचे डोळेही पाणावले होते. गावकऱ्यांनी पार्थिवाचे दर्शन घेतल्यानंतर अंत्ययात्रा काढण्यात आली. तळवार कुटुंबीयांच्या खाजगी शेत जमिनीमध्ये शोकाकुल वातावरणात शिवाजी आनंद तळवार यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. शिवाजी यांच्या अंत्यसंस्कारास समस्त नावगे गांव लोटला होता.

मयत हवालदार शिवाजी तळवार यांच्या पश्चात आई -वडील, पत्नी व तीन विवाहीत बंधू असा परिवार आहे. लहानपणापासून साध्या सरळ प्रेमळ वृत्तीचे असल्यामुळे शिवाजी हे गांवात सर्वांनाच प्रिय होते. त्यांचे शालेय शिक्षण मराठी शाळा नावगे आणि माध्यमिक विद्यालय कर्ले येथे पूर्ण झाले. उत्कृष्ट क्रीडापटू असणाऱ्या शिवाजी यांनी कबड्डीमध्ये राष्ट्रीय स्तरापर्यंत मजल मारली होती.

त्यांना सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून सन्मानितही करण्यात आले होते. त्यानंतर 2002 मध्ये ते भारतीय लष्करात जवान म्हणून रुजू झाले. गेल्या 2012 साली त्यांचा विवाह झाला होता. शिस्तप्रिय परंतु अतिशय मनमिळावू व प्रेमळ स्वभावाच्या शिवाजी तळवार यांच्या या अकाली निधनामुळे नावगे गांवात हळहळ व्यक्त होत आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.