राज्यभरात अनेक विद्यापीठातून परीक्षांचे आयोजन केले जात आहे. परंतु याबाबत विद्यार्थ्यांकडे कोणतीही माहिती उपलब्ध होत नाही. सरकार आणि विद्यापीठामध्ये समन्वय नाही. याचा फटका विद्यार्थीवर्गाला बसत असून विद्यार्थी गोंधळलेल्या मानसिकतेत आहेत. यासंदर्भातील स्पष्टीकरण सरकारने द्यावे, अशी मागणी करत आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन सादर केले.
अनेक विद्यापीठांनी आपले अभ्यासक्रम बदलले आहेत. बदलण्यात आलेल्या अभ्यासक्रमाची माहिती अजूनही विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलेली नाही. अजूनही काही विद्यार्थी जुन्या अभ्यासक्रमाला अनुसरूनच अभ्यास करत आहेत. तर काही विद्यार्थी बदललेल्या अभ्यासक्रमाविषयी सांगत आहेत. यामुळे संभ्रम निर्माण झाला असून सरकारने योग्य ते स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
याचप्रमाणे प्रत्येक विद्यापीठानेही विद्यार्थ्यांना योग्य माहिती दिली नाही. परीक्षांबाबतही ठोस निर्णय आणि माहिती पुरविण्यात आली नाही. येत्या काळात परीक्षा कोणत्या तत्वावर घेतली जाणार आहे, हे स्पष्ट करणे गरजेचे असून विद्यार्थ्यांच्या समस्यांबाबत विद्यापीठांनी गुगलद्वारे सर्व्हे हाती घ्यावा. आणि विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांचे निराकरण करावे, विविध विषयाच्या प्राध्यापकांशी चर्चा करून त्यांचा सल्ला घ्यावा, तसेच अकॅडेमिक कॅलेंडर प्रसिद्ध करावे, विद्यार्थी आणि शिक्षकांवर कोणत्याही प्रकारचा दबाव आणण्यात येऊ नये, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर अनेक जिल्ह्यातील विद्यार्थी योग्य वेळेत परीक्षेला हजार राहू शकणार नाहीत. शिवाय सध्या ऑनलाईन अभ्यासक्रम शिकवण्यात येत असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना नेटवर्क मुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. ऑनलाइन क्लाससहित महाविद्यालये सुरु झाल्यानंतरही पुन्हा एकदा या अभ्यासक्रमाची उजळणी घेण्यात यावी, अशीही मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
यावेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे रोहित उमनाबादिमठ, किरण दुकानदार, संदीप देशपांडे यांच्यासह इतर उपस्थित होते.