शेतात काम करणाऱ्या शेतकरी युवकाचा करंट लागून दुर्दैवी अंत झाल्याची घटना बुधवारी दुपारी बेळगाव तालुक्यातील बेळगुंदी येथे घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विक्रम महादेव पाऊसकर वय 35 असे या मयत दुर्दैवी युवकाचे नाव आहे.विक्रम हा आपल्या शेतात औषध फवारणी करायला गेला होता त्यावेळी मुख्य खांब्यावरील तुटलेल्या विद्युत भारित तारेचा स्पर्श होऊन त्याचा मृत्यू झाला आहे.
खांबावरून जाणारी विद्युत वहिनी तुटली होती ग्रामस्थांनी तक्रार देखील दिली होती मात्र हेस्कॉमने याकडे दुर्लक्ष केल्याने हा अपघात घडला असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
मयत विक्रम याच्या पश्चात पत्नी दोन लहान मुलं आई वडील असा परिवार आहे. शेतात औषध फवारणी करताना ही घटना दुपारी अडीचच्या दरम्यान घडली आहे.विक्रम याला शरीरावर दोन ठिकाणी विद्युत भारीत तारांचा स्पर्श झाला होता.
ग्रामीण भागात तुटलेल्या विद्युत वाहिनीची दुरुस्ती न केल्याने एक शेतकरी युवकाचा बळी गेला असल्याने बेळगुंदी गावात हळहळ व्यक्त होत आहे.बेळगाव ग्रामीण पोलिसांत गुन्हा नोंद झाला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
ए पी एम सी आणि राज्य सरकारने मयत युवा शेतकऱ्यांच्या कुटुंबाला मदत करावी अशी मागणी केली जात आहे.