Friday, January 10, 2025

/

गायरान जमिनीत कचरा डेपोला या गावातील शेतकऱ्यांचा विरोध

 belgaum

सांबरा गावातील सर्वे क्रमांक 2९६ मधील सरकारी गायरान जमिनीवर ग्रामपंचायतीच्या वतीने कचरा डेपोची निर्मिती करण्यात येत आहे. याला या भागातील शेतकऱ्यांचा विरोध असून हा कचरा डेपो प्रकल्प त्वरित रद्द करावा अशी मागणी सांबरा येथील शेतकऱ्यांनी केली आहे. यासाठी आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले आहे.

ही गायरान जमीन गरीब शेतकऱ्यांसाठी वरदान असून या जमिनीवर सहा महिने पुरेल इतका चारा आहे. गेल्या सहा महिन्यात चारा टंचाईवर मात केली आहे. परंतु येथील शेतकऱ्यांचा कसलाही विचार न करता स्वार्थासाठी या जमिनीवर कचरा डेपो उभारण्याचा प्रयत्न सुरु आहे. यासंदर्भात सांबरा गावातली एकही शेतकऱ्याला विश्वासात घेण्यात आले नसून पंचायत विकास अधिकाऱ्यांनी या प्रकल्पाला ग्रामपंचायतीत देखील कोणत्याही सदस्याला स्पष्ट माहिती न देता अनुमोदन मिळविले आहे. शेती आणि दूध उत्पादन हे दोनच व्यवसाय शेतकरी करत असून यावरच शेतकऱ्यांचे जीवन अवलंबून असते.

सांबरा गावातील ६० टक्क्याहून अधिक जमीन ही एअरफोर्स साठी ताब्यात घेण्यात आली आहे. आणि आता त्याहून कहर म्हणजे या भागातील गायरान जमीनही कचरा डेपोसाठी बळकावण्यात येत आहे. याला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे.

गेल्या ६-७ महिन्यांपासून कोरोनामुळे अनेकजण अडचणीत आले आहेत. बाजारपेठ उपलब्ध नसल्यामुळे अनेक शेतकरी अडचणीत आले आहेत. शेतीमाल असाच पडून राहिल्यामुळे नुकसान सोसावे लागले आहे. अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारला आहे. ही सर्व परिस्थिती माहित असूनही कचरा डेपोचा घाट घालण्यात आला आहे. हा कचरा डेपो प्रकल्प त्वरित रद्द करण्यात आला नाही तर शेतकऱ्यांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

सुमारे १२०० जनावरे चारण्यासाठी कमीतकमी २० एकर गायरान जमिनीची आवश्यकता असते. सध्या सांबरा गावात सुमारे २८५५ जनावरे आहेत. परंतु या भागात केवळ ७ एकर जमीन आहे. असे असूनही ५ एकरमध्ये हा कचरा डेपो करण्याचा सरकारचा घाट आहे. शेतकऱ्यांच्या समस्यांचा विचार करून सर्वे क्रमांक १४९ येथील ७ एकर जमीन ही गायरान म्हणून उपलब्ध करून द्यावी, अशी विनंतीही निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

या प्रकल्पासाठी विमानतळाच्या दक्षिणेला प्लॉट पाडविण्यात आले आहेत. तेथे ३ एकर २० गुंठे जागा खुली आहे अशी माहिती पीडीओंनी दिली आहे. त्यामुळे सदर खुल्या जागेत हा प्रकल्प करावा अशी मागणी शेतकऱ्यांच्यावतीने करण्यात आली आहे.

हे निवेदन सादर करताना सांबरा भागातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.