कर्नाटक राज्य माध्यमिक शिक्षक संघ, बेळगाव जिल्हा शाखेच्यावतीने शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी आज जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सरकारला निवेदन देण्यात आले.
कोरोना महामारीच्या काळात शिक्षण व्यवस्थेवर परिणाम झाला असून, शाळा पूर्ववत कधी सुरु होणार याची निश्चिती नसल्याने विद्यार्थ्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सरकारने सुरु केलेल्या विविध उपक्रमाचे शिक्षक संघाने कौतुक केले असून सर्वतोपरी सहकार्य करण्याचे ठरविले आहे.
कोरोना संसर्गाचा धोका असूनही शिक्षण खात्यातर्फे प्राथमिक विभागातील सरकारी शाळांचे शिक्षक प्रत्यक्ष कार्यशाळेत सहभागी होत आहे. याचप्रमाणे विद्यागम सारख्या उपक्रमातही शिक्षक सहभागी होत आहेत. यामध्ये अनेक शिक्षकांना कोरोनाची बाधा झाल्याचे निदर्शनास आले आहे. शिवाय सरकारी योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी शिक्षकांचा सहभाग असतो. यासर्व गोष्टींमध्ये शिक्षकांच्या जीवाचा विचार सरकारने करावा, अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.
या मागण्यांसह समाजातील जास्तीत जास्त घटकांना मदत मिळावी म्हणून सरकारने विशेष आर्थिक मदत जाहीर केली पण त्यात विना अनुदानित शिक्षकांना वगळण्यात आले. काही संस्थांनी शिक्षकांना कामावरून कमी केले तर काही संस्थांनी अर्धा पगार देऊन कामावर रुजू केले. त्यामुळे हे शिक्षक अडचणीत सापडले आहेत. शिवाय शिक्षकांच्या कुटुंबावरही उपासमारीची वेळ आली आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून सरकारने तात्काळ विशेष आर्थिक मदत जाहीर करावी, अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.
हे निवेदन सादर करताना कर्नाटक राज्य माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष एकनाथ पाटील, सचिव उमेश कुलकर्णी, सहसचिव वामन कुलकर्णी, खजिनदार सुरेश कळ्ळेकर, माजी जिल्हाध्यक्ष राजू कुडतूरकर, एन ओ डोणकरी, शहराध्यक्ष संजिव कोष्टी, शहर सचिव अंगडी, राज्य सचिव आर.पी.वंटगुडी, उपाध्यक्ष विश्वजीत हसबे, व्ही.एन. पाटील. मंजुनाथ गोलीहळ्ळी यांच्यासह जिल्ह्यातील शिक्षक पदाधिकारी उपस्थित होते.