राणी चन्नम्मा विद्यापीठ हिरेबागेवाडी येथे स्थलांतरीत करण्यासाठी महसूल मंत्री आर. अशोक यांनी हिरवा कंदील दाखविल्याचे वृत्त ताजे असतानाच केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी एक नवा खुलासा केला आहे.
या विद्यापीठाचे कामकाज भुतरामहट्टी येथे जैसे थे राहणार असून विद्यापीठाला कोणताही धक्का पोहोचणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
शिवाय हे विद्यापीठ संपूर्णपणे हिरेबागेवाडी येथे स्थलांतरित होणार नसून वनविभागाने विद्यापीठ विस्तारासाठी परवानगी नाकारली आहे, यासाठी अतिरिक्त अभ्यासक्रमासाठी हिरेबागेवाडी येथे इमारत विस्तार करण्यात येणार आहे. सध्या भुतरामहट्टी येथे सुरु असलेले उपक्रम हे तसेच पुढे सुरु राहणार आहेत.
या उपक्रमाव्यतिरिक्त इतर नवे उपक्रम आणि विविध अभ्यासक्रम हे हिरेबागेवाडी येथे सुरु करण्यात येतील. भुतरामहट्टी येथे नवे उपक्रम राबविण्यासाठी जागा अपुरी पडत आहे. त्यामुळे विद्यापीठ विस्ताराचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. परंतु वनविभागाने परवानगी नाकारल्याने उर्वरित उपक्रमासाठी हिरेबागेवाडी येथे विद्यापीठ विस्तार करण्याचा विचार करण्यात आला आहे.
विद्यापीठाच्या विकासासाठी सरकारने पुष्कळ अनुदान मंजूर केले आहे. हे अनुदान रद्द होऊ नये यासाठी संपूर्ण विचाराअंती हिरेबागेवाडी येथे विद्यापीठ स्थलांतरित करण्याचे नियोजन केले आहे, अशी माहिती सतीश जारकीहोळी यांनी दिली आहे.