मच्छे येथे झालेल्या डबल मर्डर प्रकरणाच्या तपासासाठी तीन पथकांची स्थापना करण्यात आली असून, या पथकांना ठोस धागेदोरे मिळाले आहेत. तसेच, आरोपींची ओळखही पटली आहे. मच्छे येथे दोन विवाहितांच्या खुनाचा उलगडा येत्या 24 तासांत होण्याची शक्यता आहे, असे संकेत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले आहेत.
या प्रकरणाचा उलगडा फोन कॉल्स डिटेलवरून करण्यात येत असून, पोलीस खाते मारेकऱ्यांचा तपास घेण्यात यशस्वी झाली आहे अशी विश्वसनीय माहिती मिळाली आहे. मात्र याबाबत गुप्तता पाळण्यात आली असून या एकूण प्रकरणाचा छडा आज सायंकाळी अधिकाऱ्यांकडून जाहीर होण्याची शक्यता आहे.
मूळच्या काळेनट्टी आणि सध्या मच्छे येथे वास्तव्यास असणाऱ्या रोहिणी गंगाप्पा हुलिमनी (वय २१) आणि राजश्री रवी बन्नूर (वय २१) या दोघींची चाकूने वार करून २६ सप्टेंबर रोजी हत्या करण्यात आली होती. यातील एक महिला गर्भवती होती. संध्याकाळच्या वेळी वॉकिंग साठी म्हणून गेलेल्या या दोघीही मैत्रिणींची अचानक निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याने बेळगाव हादरले होते. केवळ १५ दिवसांपूर्वीच मच्छे येथे आलेल्या या तरुणींचा खून नेमका कोणी आणि कशासाठी केला? याचा तपास घेण्यासाठी पोलीस अधिकारी कसून तपास करत होते. या हत्याकांडाची दखल गांभीर्याने घेत पोलीस आयुक्तांनी तपासासाठी तीन पथकांची स्थापना केली. या तपासात या पथकाला यश आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.
या प्रकरणाचा गंभार्याने मंगळवारी पोलिसांनी तपास केला. खून झाल्याच्या काही अवधीतच कॉल डिटेल्स मागविण्यात आले होते. त्यावरून पोलीस खाते एका ठोस निकषापर्यंत पोहोचले असून मारेकऱ्यांनी नवे लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे.या प्रकरणी काही युवकांना देखील ताब्यात घेण्यात आले आहे.
या प्रकरणाचा संपूर्ण तपास झाल्यानंतरच नेमके प्रकरण काय आहे याची माहिती जाहीर करण्यात येईल. हा खून कोणी करवून घेतला आहे? की वैर काढण्यासाठी स्वतःच कुणी खून केला आहे? याबाबत सखोल तपशील पोलिसांकडून घेणे सुरु असल्याने अद्याप याबाबत गुप्तता पाळण्यात आली आहे.
या प्रकरणात तपासादरम्यान पोलिसांनी नातेवाईक आणि कुटुंबियांशी चौकशीदरम्यान बातचीत केली. यादरम्यान माहिती देण्यास टाळाटाळ करणाऱ्या काहींना पोलिसी खाक्या दाखवून संशयित आणि मारेकऱ्यांचा तपशील घेण्यात आला आहे. संशयाच्या भोवऱ्यात असलेले काही जण पोलिसांच्या ताब्यात असून काही जण फरारी असल्याचीही माहिती उपलब्ध झाली आहे. खुनानंतर आरोपींनी पलायन केल्यामुळे पोलिसांसमोर तपासाचे आव्हान उभे ठाकले होते. मात्र २४ तासातच खुनाचे धागेदोरे हाती सापडले.
आणि या प्रकरणाचा ग्रामीण पोलिस तातडीने छडा लावण्याचा प्रयत्न करत असून पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन, उपयुक्त डॉ. विक्रम आमटे यांच्या मार्गदर्शनाखाली बेळगाव ग्रामीणचे पोलीस निरीक्षक सुनीलकुमार नंदेश्वर यांच्या सहकाऱ्यांनी तपास सुरु केला आहे. येत्या एका दिवसात या संशयितांना अटक होऊन लवकरच या प्रकरणाचा उलगडा होण्याची शक्यता आहे.