देशासह संपूर्ण जगात कोरोना महामारीमुळे भयभीत नागरिक यापासून वाचण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र कोरोना काळातही बेळगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायत निवडणुकीची धामधूम सुरू असल्याची चित्र दिसून येत आहे.
अनेक जण आतापासूनच मतदारांच्या गाठीभेटी घेण्यावर भर देत असून आपला कौल जाणून घेत आहेत. त्यामुळे कोरोना महामारीचा विचार दूर सारत निवडणुकीच्या तयारीला अनेक जण लागल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. आतापासूनच अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे तर काही जणांनी मतदारांची मते जाणून घेण्यासाठी प्रयत्न सुरू केला आहे.
त्यामुळे निवडणुकीची धामधूम जोरदार सुरू असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. काहीजणांनी ओल्या पार्ट्या करण्यातही आता पासून सुरुवात केली आहे. अनेक समर्थक संबंधित नेत्याच्या प्रचारासाठी सरसावले आहेत. त्यामुळे कोरोनाला विसरून निवडणुकीच्या तयारीत अनेक जण गुंतल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
ग्रामपंचायत निवडणूक मे महिन्यात होणार होती. मात्र कोरोना महामारीमुळे ती पुढे ढकलण्यात आली आहे. येत्या दोन महिन्यात या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे अनेक जण आचारसंहिता आणि निवडणूक आयोग कधी एकदा निवडणूक जाहीर करणार याकडे नजर लावून आहेत.
दरम्यान निवडणूक आयोगाने आरक्षण जाहीर केले आहे. त्यामुळे त्याच्या कार्यक्षेत्रात अनेक इच्छुक जोरदार तयारी करत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. निवडणुक आयोग कधी एकदा निवडणूक जाहीर करणार याकडे सार्यांचे नजरा लागून राहिल्या आहेत.