Wednesday, May 1, 2024

/

पोलिसांचं जरा चुकलंच!

 belgaum

कायद्याचे रक्षकच जर कायदा स्वतःच्या हातात घेत असतील तर सामान्य जनतेने न्यायासाठी कुणाकडे जावं? अशा संभ्रमात बेळगावची जनता सापडली आहे.

काल दक्षिण रहदारी पोलिसांनी केलेल्या हेल्मेटसक्तीच्या कारवाईत अभिजित लोहार (34) उप्पार गल्ली खासबाग, बेळगांव येथील युवक जखमी झाला. त्याच्यावर लाठीमार करण्यात आल्यामुळे त्याच्या नाकातून रक्त वाहू लागले. संबंधित व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि सर्वत्र रहदारी पोलिसांच्या विरोधात नाराजीचे सूर उमटू लागले.

बेळगावमध्ये हेल्मेटसक्ती साठी रहदारी पोलीस विभागाच्या वतीने ठिकठिकाणी कारवाई हाती घेण्यात येते. अनेक ठिकाणी आडवळणावर रहदारी पोलिसांच्या गाड्या उभ्या असतात. अशामुळे अनेक नागरिक धास्तावतात. परंतु सध्या कोविडमुळे उद्भवलेल्या परिस्थितीत अशाप्रकारे कारवाई करणे, हे कितपत योग्य आहे? याची शहानिशा पोलिसांनी करणे गरजेचे आहे. हेल्मेट हे प्रत्येकाच्या संरक्षणासाठी आहे हे मान्य आहे. परंतु सक्ती करताना आणि त्यावरची कारवाई करताना पोलिसांनी सहकार्याची भूमिका घेणे आवश्यक आहे.

 belgaum
Traffic police besten youth
Traffic police beaten youth

कायदा हा सर्वांसाठी समानच आहे. आणि जो कायदा मोडेल त्यावर शिक्षा आणि कारवाई ही झालीच पाहिजे. परंतु कारवाई करताना कायदा हातात घेऊन करण्यात येणारी कारवाई ही अयोग्यच आहे.

काल झालेल्या प्रकारामुळे बेळगावमध्ये सर्वत्र रहदारी पोलिसांच्या विरोधात नाराजीच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या. कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीनंतर आता कुठं प्रत्येक जण सावरतो आहे. रोजगार, व्यवसाय – उद्योग याची घडी आता कुठे सुरळीत बसत आहे. अशावेळी अशापद्धतीने करण्यात येणार कारवाईचा बडगा जनतेला मनस्ताप देणारा ठरत आहे.

या परिस्थितीत दैनंदिन आयुष्य जगणे मुश्किल झाले आहे. आपला उदरनिर्वाह करण्यासाठी प्रत्येकजण धडपड करत आहे. लॉकडाऊननंतर पैशांची तजवीज करणे हे अवघड झाले असून पोलिसांच्या अशा वागणुकीबाबतीत कोण जाब विचारणार? काल झालेल्या प्रकारानंतर घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी या पोलिसांना चांगलेच धारेवर धरले आणि जाबही विचारला. त्यानंतर अक्षरशः रहदारी पोलीस आणि इन्स्पेक्टर या दोघांनीही तेथून पळ काढला.

या घडलेल्या प्रकारानंतर जनतेवर अशापद्धतीने कारवाईचा बडगा उगारणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी आणि रहदारी पोलीस विभागाने संबंधित पोलीस अधिकाऱ्याला योग्य ते शासन करावे, अशी मागणी जनतेतून करण्यात येत आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.