शहराच्या सर्वांगीण विकासासाठी बेळगाव शहरात प्रत्येक दहा वर्षांनी सीडीपी अंतर्गत कामकाज करण्यात येते. सध्या कार्यरत असलेल्या सीडीपीचा कार्यकाळ मार्चमध्ये संपुष्टात येणार असून नवीन सीडीपी कामकाजासाठी केंद्र सरकारने अमृत योजनेंतर्गत फ्रान्सच्या एका खाजगी कंपनीला कंत्राट देण्याचे ठरविले आहे.
बेळगावसह हुबळी-धारवाड आणि गदग या तीन जिल्ह्यांमध्ये नवीन सीडीपी राबविण्यात येणार आहे. यापूर्वी हे कामकाज नागरी विकास प्राधिकरणाच्या अंतर्गत व्हायचे. परंतु आता हे कामकाज अमृत योजनेंतर्गत फ्रान्सस्थित EGIS या कंपनीच्या माध्यमातून कंत्राटदार तत्वावर होणार आहे.
येत्या सहा महिन्यात नवीन सीडीपी तयार करण्यासाठी अटी आणि नियम घालून देण्यात आले आहेत. हे नवीन सीडीपी सहा महिन्यानंतर शहरामध्ये लागू करण्यात येणार आहे.
याव्यतिरिक्त आणखी काही महत्त्वपूर्ण विकासकामे बुडाच्या व्याप्तीत येणाऱ्या परिसरासाठी हाती घेण्यात येणार आहेत. यामध्ये २८ गावांचा समावेश करण्यासाठी बुडणे राज्य सरकारकडे प्रस्ताव सादर केला आहे.
राज्य सरकारने या प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर २८ गावे समाविष्ट केली जाणार आहेत. परंतु नव्या सीडीपीमध्ये या २८ गावांचा समावेश असणार नाही, अशी माहिती बुडा आयुक्त प्रितम नरसलापुरे यांनी दिली आहे.