मार्च महिन्यापासून धुमाकूळ घातलेल्या कोरोनामुळे संपूर्ण जगातील जनता हतबल झाली आहे. याकाळात अनेक कोरोना वॉरियर्स आपल्या जीवाची पर्वा न करता झटत आहेत. बेळगावमध्ये अनेक संस्था पुढाकार घेऊन कोरोनाकाळात मदतीला धावल्या आहेत. बेळगावमध्ये मागील ३ महिन्यांपासून “कोविड सपोर्ट ग्रुप” च्या माध्यमातून अनेकांना मदतीचा हात मिळाला आहे.
सरकारने कोविड संदर्भात अनेक हेल्पलाइन्स जारी केल्या. अनेक सुविधाही पुरविण्याच्या घोषणा केल्या. मात्र काही वेळानंतर प्रशासकीय यंत्रणा कमकुवत झाली. अशावेळी अनेक सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतला. अशा सामाजिक संस्थांपैकी “कोविड सपोर्ट ग्रुप” चे नाव अग्रक्रमाने घेतले जाते.
जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन मानवतेचा संदेश देत हि संस्था प्रत्येकाच्या मदतीला धावून जात आहे. अनेक कार्यकर्ते स्वयंप्रेरणेने रुग्णांची मदत करत आहेत. मग ती मदत कोणत्याही स्वरूपाची असो. कोणत्याही रुग्णांसाठी असो.. आणि कोणत्याही धर्माच्यापलीकडे जाऊन या संस्था कार्यरत आहेत, हे विशेष. कोविडमुळे अनेकांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली. अनेकांना कोविडसह इतर आजारांवर उपचार मिळणे कठीण झाले पण अशा परिस्थिती “कोविड सपोर्ट ग्रुप”च्या वतीने सर्व सोयी रुग्णांना पुरविण्यात आल्या.
कोणत्याही आजारासाठी 24×7 हॉस्पिटल सुविधा, ऑक्सिजन पुरवठा, प्लाझ्मा थेरपी, अंत्यसंस्कारासाठी मदतकार्य, रुग्णवाहिका सेवा, तसेच औषधांचा पुरवठा या ग्रुपच्या माध्यमातून करण्यात येत आहे.
अल-इकरा, अंजुमन-ए-इस्लाम, मदिना फाउंडेशन, मिसवा फाउंडेशन, मस्जिद-ए-कैफ, पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया, रेहमान फौंडेशन, ख्वाजा गरीब नवाज ट्रस्ट, शिफा, खादीमिन, बागवान जमात, अल-नासर, टिपू सेना, रेहबार, सहारा ट्रस्ट, अल हिंद, व्हीएमसी फौंडेशन अशा अनेक सामाजिक संस्था एकत्रित येऊन हे काम करत आहेत.
कोविड वरील प्रभावी लास अजून आली नाही. परंतु रोगप्रतिकारक शक्ती उत्तम असलेल्या नागरिकांवर प्लाझ्मा चाचणी करण्यात येत होती. या दरम्यान प्लाझ्मा देणाऱ्यांची आवश्यकता होती. अशावेळी मुस्लिम समाजातील अनेक बांधवानी स्वतः पुढाकार घेऊन प्लाझ्मा दान देण्याचे कार्य केले आहे. यामुळे अनेक रुग्णांना खूप मोठी मदत झाली आहे.
याशिवाय कोरोनामुळे धास्तावलेले नागरिक कोणत्याही आजाराच्या रुग्णाच्या मदतीला धावून जाताना दिसत नाहीत. परंतु या ग्रुपच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमानातून कोणत्याही जाती – धर्माचा भेदभाव न करता तातडीने मृत व्यक्तीवर अंत्यसंस्कारासाठी धाव घेतली जाते. त्यासोबतच त्या व्यक्तीच्या धर्मानुसार मृतदेहावर अंत्यसंस्कार केले जातात.
या ग्रुपच्या माध्यमातून जी काही कामे केली जातात याचा मोबदला मात्र यांच्याकडून आकारला जात नाही. जात, धर्म, भाषा या पलीकडे जाऊन केवळ मानवतेचा आणि शांतीचा संदेश देत या संस्था बेळगाव जिल्ह्यात कार्यरत आहेत. आझम नगर, कॅम्प, अशोक नगर, गांधी नगर, अमन नगर याठिकाणी या संस्थांची माहिती केंद्रे उपलब्ध आहेत. कोणत्याही अडचणीच्या काळात १८०० १०२ २७१६ या टोल फ्री क्रमांकावर आपण संपर्क साधू शकतो.
आजच्या काळात अशा संस्थांची खरी आवश्यकता आहे. शक्यतो कोणीही आपल्या फायद्याशिवाय कुणाचीही मदत करायला पुढाकार घेत नाही. परंतु आज उद्भवलेल्या कठीण काळातही अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या आणि जाती धर्मापलीकडे जाऊन काम करणाऱ्या या सामाजिक संस्थांना “बेळगाव लाईव्ह”चा सलाम आणि पुढील कार्यासाठी शुभेच्छा!