आपल्या देशात राजकारणातून पुढे आलेले असे अनेक नेते आहेत. राष्ट्रीय पातळीवर विविध पक्षांशी जोडले जाणारे नेतेही आहेत. आणि यासोबतच गल्लीतल्या राजकारणातही पदासाठी रस्सीखेच करणारे असे अनेक नेते आहेत. परंतु सीमाभाग बेळगाव मधील शिवसेनेच्या नेत्यांचे, पदाधिकाऱ्यांचे याहून वेगळेच असे समीकरण आहे. सीमाभागातील शिवसेनेची नेमकी दिशा कोणती आहे? बेळगावमध्ये एका शिवसेनेत स्वयंघोषित अनेक अध्यक्ष – उपाध्यक्ष, पदाधिकारी आहेत. या सर्व सावल्या गोंधळात कार्यकर्ते मात्र संभ्रमात पडले आहेत. त्यामुळे सीमाभागातील मराठी माणूस “नेमका कोणाचा झेंडा हाती घ्यावा?”, अशा विवंचनेत आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून सीमाभागातील शिवसेनेच्या पदांवर स्वतःचे वर्चस्व आणि अधिकार सांगत आलेले नेते आपली पदे सोडायला तयार नाहीत. प्रत्येक नेते स्वयंघोषीत पदभार स्वीकारून सीमाभागातील शिवसेनेत दुफळी माजवत आहेत. प्रत्येक नेता स्वतःच्या “बॅनर” खाली अनेक कार्यक्रम, उपक्रम राबवत असतो. यामुळे सीमाभागातील शिवसेना नेमक्या कोणत्या दिशेने प्रवास करत आहे? असा सवाल शिवसैनिकातून उपस्थित केला जात आहे.
सीमाभागातील शिवसेनेत लवकरच फेरबदल होण्याची चिन्हे आहेत. बेळगावमध्ये शिवसेनेचे १२ नेते कार्यरत असून ३० उपनेते आहेत. अध्यक्ष कोण उपाध्यक्ष कोण या संभ्रमात कार्यकर्ते अडकले असतानाच माजी जिल्हाप्रमुख हणमंत मजूकर हे स्वतःला नेते म्हणवून घेत आहेत. महेश टांकसाळी हे उपजिल्हा प्रमुख म्हणून कार्यरत होते. त्यांनी यापूर्वीच आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे मेहश टांकसाळी माजी उपजिल्हाप्रमुख तर हणमंत मजूकर हे माजी जिल्हाप्रमुख आहेत. याप्रमाणेच खानापूर तालुक्यातील के. पी. पाटील हे स्वतःला स्वयंघोषित “कर्नाटक राज्य उपाध्यक्ष” म्हणवून घेतात. गेल्या अनेक वर्षांपासून सीमाभागात सातत्याने सहसंप्रर्क प्रमुख अरविंद नागनुरी यांच्या मार्गदर्शनाखाली माजी उपमहापौर प्रकाश शिरोळकर यांच्यासह बंडू केरवाडकर, सचिन गोरले ,प्रवीण तेजम यांच्यासारखे अनेक कार्यकर्ते पक्ष बळकट करण्यासाठी आणि सीमाभागात सत्ता आणण्यासाठी धडपडत आहेत. तर मधल्या काळात हणमंत मजूकर यांनी सीमाभागातील शिवसेनेत स्वतःचा स्वतंत्र असा पदभार सांभाळत परस्पर कार्यक्रम आखले. या दरम्यान शिवसेनेत दोन गट झाल्याचे जाहीर झाले. शिवसेनेच्या वरिष्ठ सूचनेनुसार के. पी. पाटील यांना कोणतेही नियुक्तीचे पत्र दिले नसल्याचे समजते. हि माहिती अरविंद नागनुरी यांनी एका पत्राद्वारे प्रसिद्धीस आणली आहे.
शिवसेनेच्या धोरणानुसार सहसंपर्क प्रमुखांना विश्वासात घेऊन मंजुरी घ्यावी लागते. परंतु हुबळी येथील प्रभारी उपराज्यप्रमुख हाकाटी यांनी कोणत्याही प्रकारची मंजुरी न घेता पदाधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये दुफळी माजली आहे. एकाच पक्षात गट-तटाच्या राजकारणाला ऊत आला आहे. सीमाभागात पक्षसंघटनेसाठी लवकरच नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात येणार आहे. शिवाय युवासेनेचीही स्थापना करण्यात येणार आहे, असेही या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
कोरोनामुळे उद्भवलेले संकट निवळताच पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उध्द्वव ठाकरे , युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे, समन्वयक मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट सीमाभागातील शिवसेना पदाधिकारी घेणार आहेत. यासंदर्भात माजी वर्स्त्रोद्योग मंत्री अर्जुन खोतकर हे बेळगावला लवकरच भेट देणार आहेत, अशी माहिती अरविंद नागनुरी यांनी पत्राद्वारे दिली आहे.
यासोबतच दुसऱ्या बाजूला हणमंत मजूकर यांनीही एक पत्रक प्रसिद्ध केले आहे. यामध्ये सीमाभागाचे सहसंपर्क प्रमुख असलेल्या अरविंद नागनुरी यांच्यावर ताशेरे ओढण्यात आले आहेत. नागनुरी यांना कायदेशीर नोटीस देऊ असा इशारा देखील हणमंत मजुकर यांनी दिला आहे.हे गट-तटाचे राजकारण पाहता शिवसेनेत दुफळी असल्याचे स्पष्ट झाले आहे.
सीमाभागात महाराष्ट्र एकीकरण समितीमध्ये आधीच खिंडार पडली आहे. गट-तटाच्या राजकारणामुळे महाराष्ट्र एकीकरण समिती निष्क्रिय आहे. अशातच मराठी माणसाला आधार वाटणाऱ्या शिवसेनेत देखील अशीच दुफळी पडल्यास मराठी माणूस पुरता हतबल होईल. शिवाय “दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ” होऊन “माकडाच्या हातात कोलीत” सापडू नये, इतकीच माफक अपेक्षा शिवसैनिक करत आहेत.