गेल्या तीन-चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील नदी -नाले दुथडी भरून वाहत आहेत. यामुळे घटप्रभा नदीमध्ये आज गुरुवारी सायंकाळी 5 वाजता 39,536 क्युसेस इतके मोठ्या प्रमाणातपाणी वाहत होते.
गेल्या कांही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार मुसळधार पावसामुळे हिरण्यकेशी आणि मार्कंडेय या नद्यांसमवेत बळ्ळारी नाला देखील तुडुंब भरून वाहू लागला आहे. परिणामी घटप्रभा नदीपात्राची पातळी वाढली आहे. हिरण्यकेशी नदीतून 20,135 क्युसेस, मार्कंडेय नदीतून 9,050 क्युसेस आणि बळळारी नाल्यातून 10,348 क्यूसेस इतके पाणी गुरुवारी सायंकाळी घटप्रभा नदीला मिळाल्यामुळे ही नदी तुडूंब भरून वहात होती.
दरम्यान, आज सायंकाळी 5 वाजता राजापूर धरणातून कृष्णा नदीमध्ये 1,10,000 क्युसेस आणि दुध गंगा नदीत 30,272 क्युसेस पाण्याचा विसर्ग करण्यात झाला. याव्यतिरिक्त कल्लोळी धरणातून 1,40,272 क्युसेस पाणी सोडण्यात आले आहे.
एकंदर गेल्या कांही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील जवळपास सर्व जलाशयातील पाण्याची पातळी वाढली असली तरीही अद्याप कोणत्याही जलाशयाने धोक्याची पातळी ओलांडलेली नाही.