कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन अनेक परंपरागत चालत आलेल्या सण-उत्सव वावर निर्बंध घालण्यात धन्यता मानत आहे. मात्र महत्त्वाचे म्हणजे बेळगाव शहरात गणेशोत्सवाला शंभर वर्षांची परंपरा आहे. ही देखील आता खंडित करण्यासाठी प्रशासन पाऊल उचलत आहे. त्यामुळे ही परंपरा कायम ठेवण्यासाठी आपण जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढू आणि ही परंपरा अबाधित राहण्यासाठी प्रयत्न करू, असा इशारा श्रीराम सेनेचे संस्थापक प्रमोद मुतालिक यांनी दिला आहे.
कोविडच्या नावावर शेकडो वर्षांची परंपरा मोडीत काढण्याच्या सरकारच्या प्रयत्नाचा निषेध करत, १७ ऑगस्टला हिंदू संघटना, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे, मूर्तिकार यांच्यासह सर्वसामान्य नागरिक संबंधित जिल्ह्यांच्या जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर धरणे सत्याग्रह करणार असल्याची माहिती श्रीराम सेनेचे प्रमुख प्रमोद मुतालिक यांनी दिली.
शुक्रवारी, शहरात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की, बाळ गंगाधर टिळक यांनी देशावर राज्य करणाऱ्या ब्रिटीशांशी लढा देण्यासाठी, जनतेने एकत्र यावे यासाठी हा सार्वजनिक गणेशोत्सव सुरु केला होता. त्याचा दीर्घ इतिहास आहे. ते म्हणाले की, कोविड यांच्या नावावर भाजपा सरकार हा उत्सव साजरा करण्यासाठी परवानगी नाकारत आहे.
कोविडचा फैलाव सुरु असताना देखील सरकारने मंदिर, बार, मॉल, चर्च, मशिद, जिम, बस आणि इतर व्यापार व्यवसायांना सुरु करण्यास मंजुरी दिली आहे. पण हिंदूंचा सण असलेल्या गणेशोत्सवाला परवानगी देत नाही. सरकारने कोविड नियंत्रण कायदा जारी केला आहे. यामुळे गणेश शिल्पकारांसह अनेक कुटुंबांना त्रास सहन करावा लागला आहे.
महाराष्ट्रात यापूर्वीच राज्यात गणेशोत्सव उत्सवासाठी शासनाने परवानगी दिली असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे राज्य सरकारने गणेशोत्सव साजरा करण्यासाठी परवानगी द्यावी अन्यथा कायद्याचे उल्लंघन करुन गणेशोत्सव साजरा करू असा इशारा दिला आहे. यावेळी विविध हिंदी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.