बालगीतांची दुनिया प्यारी असते. अशाच बालगीतांपैकी एक गीत शाळकरी मुलांमध्ये अतिशय आवडते आहे. शाळेला जाण्याचा कंटाळा आलेला या गाण्यातला नायक म्हणजेच सर्व शाळकरी विद्यार्थ्यांचा प्रतिनिधी भोलानाथ ला प्रश्न विचारतो, सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय? इतकेच विचारून तो थांबत नाही तर पुढे त्याच्या मनातली इच्छा प्रकट होते, “शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय?”
पण सध्या काय परिस्थिती आहे? कोरोनामुळे शैक्षणिक कार्यक्रमच धोक्यात आलाय. जी मुले पूर्वी सुट्टीसाठी धडपडायची ती आता शाळेत जाण्यासाठी तडफडत आहेत. भोलानाथ ला विचारत आहेत,
सांग सांग भोलानाथ
“कोरोना लवकर दूर होऊन
शाळा सुरू होईल काय?”
गेले पाच महिने विद्यार्थी घरी बसून आहेत. आयुष्यात पहिल्यांदाच अश्या गोष्टी घडत आहेत.ज्याचा अनुभव या पिढीने कधीच घेतला नव्हता तो कटू अनुभव येतोय. घरी बसून जीव कोंडायला आला. आपल्या संख्या मित्रांना भेटता येत नाही. सकाळी लवकर उठायचे नाही, रात्री जास्त जागायचे नाही आणि अभ्यासाचे गृहपाठाचे टेन्शन नाही. पण पूर्वी हे सारे हवेसे वाटायचे आज नको वाटतेय.
कधी एकदा शाळा सुरू होते,
कधी एकदा वर्गात जाऊ आणि कधी एकदा आपले आवडते शिक्षक भेटतील असेच आज प्रत्येक विद्यार्थ्याला वाटत असेल.
पाचवीच्या पुढच्याना online शिक्षणाचा तरी मार्ग आहे. पण त्यांनाही घराच्या चार भिंतीत शिकण्याच्या कंटाळा आला असेल.
कधी एकदा live थेट वर्गात बसू अशी त्यांची अवस्था आहे.
सप्टेंबर मध्ये किंवा ऑक्टोबर मध्ये शाळा सुरू व्हायची शक्यता आहे. पण अजून काहीच स्पष्ट नाही.बाहेर कोरोना आहे. घरात कंटाळा आलाय अशी अवस्था आहे.
शाळा म्हणजे प्रत्येकाच्या जीवनातला एक अविभाज्य भाग पण आज या कोरोनाने शाळेशी असलेले नाते तोडून टाकले आहे. हे नाते पुन्हा सुरळीत होण्यासाठी गरज आहे कोरोना जाण्याची. ही मागणी भोलानाथ लवकर पूर्ण करेल अशी आशा वाटते.