कोरोनाचा वाढता फैलाव रोखण्यासाठी गांव बंद ठेवण्याऐवजी आगामी श्रीगणेशोत्सव लक्षात घेऊन कोरोना संदर्भातील मार्गदर्शक सूचींचे तंतोतंत पालन करून दैनंदिन व्यवहार सुरू ठेवण्याचा निर्णय समस्त येळ्ळूरवासियांनी घेतला आहे.
कोरोनाचा अति फैलाव रोखण्यासाठी आज सोमवारी सकाळी येळ्ळूर गांवातील गावकऱ्यांची बैठक चांगळेश्वरी मंदिरामध्ये पार पडली. सदर बैठकीत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी गाव बंद ठेवण्याचा निर्णय घ्यायचा की नाही? यासंदर्भात चर्चा करण्यात आली.
बैठकीतील चर्चेअंती सध्या श्री गणेशोत्सव तोंडावर आला आहे. तसेच गांवातील सुमारे 75 ते 80 टक्के लोक गवंडी, सेंटरिंग आदी कामे करतात. या कामांवर त्यांच्या कुटुंबियांची उपजीविका अवलंबून आहे. गांव बंद ठेवल्यास या लोकांचा पोटापाण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे.
शिवाय श्री गणेशोत्सव देखील आनंदात साजरा करता येणार नाही, हे लक्षात घेऊन कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी गांव बंद ठेवण्याऐवजी मास्क, सोशल डिस्टंसिंग, सॅनीटायझेशन आदी मार्गदर्शक सुचींचे काटेकोर पालन करून सर्व दैनंदिन व्यवहार सुरू ठेवण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. त्याचप्रमाणे वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी डॉक्टरांना विनंती करण्याचे ठरले.
सदर बैठकीस राजु पावले, तानाजी हलगेकर, शिवाजी पाटील, राजु उघाडे, सतिश कुगजी, शांताराम कुगजी, दुध्दापा बागेवाडी, रमेश मेणसे, परशराम घाडी, अरुण येळ्ळुरकर, रामदास धुळजी, सुरज गोरल, नागेश बोबांटे, यलुप्पा पाटील, अनंत पाटील, हणमंत पाटील आदींसह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.