बेळगाव हे अनेक सांस्कृतिक चळवळींसाठी प्रसिद्ध आहे. सांस्कृतिक वारसा लाभलेल्या बेळगावमध्ये ललित कला अकादमीचे प्रादेशिक कार्यालय प्रस्तावित करण्यात आले आहे, अशी माहिती ललित कला अकादमीच्या सदस्या आणि प्राणी कल्याण मंडळाच्या सदस्य डॉ. सोनाली सरनोबत यांनी दिली आहे.
साहित्य, कला आणि संस्कृती जपण्यासाठी बेळगावमध्ये एक केंद्रस्थान निर्माण होण्याची गरज आहे. यासाठी कमीतकमी २ एकर जागेमध्ये हे प्रादेशिक कार्यालय स्थापन करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला असून दिल्ली, मुंबई, चेन्नई, भूवनेश्वर, लखनऊ, कोलकत्ता आणि शिमला येथे या केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे.
परंतु कर्नाटकातील साहित्य प्रेमींसाठी बेळगावमध्ये होणारे हे कार्यालय पहिलेच असून यासाठी ललित कला अकादमीच्या अध्यक्षांनी संपूर्ण सहकार्य देण्याचा भरवसा दिला आहे.
बेळगाव येथे होणारे हे प्रादेशिक कार्यालय साहित्यप्रेमींसाठी केंद्रस्थान बनेल आणि कला प्रेमींसाठी आणि यावर संशोधन करणाऱ्यांसाठी हे कार्यालय नक्कीच प्रोत्साहनात्मक ठरेल, असा विश्वास डॉ. सोनाली सरनोबत यांनी व्यक्त केला आहे.