खानापूर तालुक्यात चार दिवसापासून सुरु असलेल्या पावसाचा कहर कायम असून अनेक नदीनाल्यांनी पात्राबाहेर मुसंडी मारल्याने पूरस्थितीचा धोका अद्यापही कायम आहे. तालुका प्रशासनाने पूर परिस्थितीला तोंड देण्यासाठी सर्व यंत्रणांना सज्ज राहण्याचा इशारा दिला असून 24 तारखेपर्यंत नागरिकांनीही दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे.
तीन दिवसापासून पाण्याखाली असलेले मलप्रभा व हालात्री नदीवरील पूल खुले होण्याच्या प्रतीक्षेत नागरिक आहेत. 40 पेक्षा अधिक गावांचा खानापूर शहराशी वाहतुकीचा संपर्क बंद झाला आहे. नदीकाठावरील शेती पिकांना अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका बसला आहे.
पाऊस थांबण्याचे नाव घेत नसल्याने पाणी पातळी वाढल्यास नदीकाठावरील लोकवस्तीला पुराचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.
कणकुंबीत दिवसभरात 10 इंच पावसाची नोंद झाली आहे. मदर ती भागापेक्षा पश्चिम भागात पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे मलप्रभेच्या प्रवाहात चढ-उतार दिसून येत आहे. अनेक ठिकाणी जुने पूल व साकव वाहून जाण्याचे प्रकार घडत असल्याने ग्रामीण भागाच्या संपर्काची दैना उडाली आहे.
गेल्या आठवड्यात गवाळी व कोंगळा येथील म्हादईवरील लोखंडी पूल वाहून गेला होता. आता लोंढा भागातील
सातनाळी गावाला जोडणाऱ्या मार्गावर पांढरी नदीवर असलेला लाकडी साकव वाहून गेला आहे. त्यामुळे पाऊस कधी थांबतो याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.