Monday, March 10, 2025

/

स्मार्ट सिटी : बडा घर पोकळ वासा

 belgaum

बेळगाव शहराची स्मार्ट सिटी म्हणून निवड झाल्यापासून बेळगावमध्ये अनेक विकासकामांना प्रारंभ करण्यात आला. परंतु सुरुवातीपासूनच ग्रहण लागलेल्या या कामकाजांना अजूनही गती मिळत नसून विकासकामे सुरु असलेल्या प्रत्येक भागात स्मार्ट सिटी कामकाजाचा बोजवारा उडाला आहे.

सततच्या रखडलेल्या या कामकाजांमुळे नागरिक हैराण झाले असून बेळगावमधील माळ मारुती एक्स्टेंशन, वंटमुरी कॉलनी आणि आसपासच्या भागातील रहिवाशांना हि रखडलेली कामे जीवघेणी ठरत असल्याचे चित्र दिसत आहे. अधिकाऱ्यांतील समन्वय, कोणत्याही गोष्टीचा नसलेला ताळमेळ आणि या कामकाजांमुळे पसरलेली अस्वच्छता भयावह आहे.

आधीच असुविधेच्या विळख्यात अडकलेल्या महांतेश नगर, माळ मारुती एक्स्टेंशन, वंटमुरी कॉलनी आणि येथील आसपासच्या भागातील नागरिकांना स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत विकासकामे सुरु झाल्यापासून आणखी नव्या अडचणींना सामोरे जाण्याची वेळ आली आहे, असा आरोप येथील नागरिक करत आहेत. रस्त्यांची दुरवस्था, तुडुंब भरलेल्या गटारी, पथदीपांची गैरसोय आणि अशा अनेक अडचणी येथील नागरिकांच्यासमोर आवासून उभ्या आहेत. पण कुचकामी यंत्रणा आणि दर्जाहीन कामांमुळे स्मार्ट सिटी प्रकल्प नेमका कुठे स्मार्टपणे काम करत आहे असा मिश्किल सवाल आता प्रत्येक नागरिक करत आहे.

येथील स्थानिक माजी नगरसेवक आणि बेळगाव स्मार्ट सिटी प्रकल्पाचे माजी संचालक डॉ. दिनेश नशिपुडी यांनीही एका प्रसारमाध्यमांशी बोलताना या स्मार्ट सिटी प्रकल्पांतारागत होणाऱ्या कामकाजावर ताशेरे ओढले आहेत. या प्रकल्पांतर्गत होणारी कामे हि निकृष्ट दर्जाची असून योग्य रीतीने हे कामकाज राबविण्यात येत नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

Smart city
Smart city file pic

डॉ.नाशीपुडी पुढे म्हणतात कि, हि कामे राबविताना पाणीपुरवठा मंडळ, हेस्कॉम, बीएसएनएल या विभागांशी समन्वय साधला नसून खोदकाम करताना अनेक गोष्टींकडे दुर्लक्ष करून नुकसान करण्यात आले आहे. मजुरांना योग्य त्या सूचना देण्यात आल्या नसल्यामुळे कामकाजात ताळमेळ नाही आणि यामुळे अनेक समस्या अनेक ठिकाणी उद्भवत असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. या कामकाजामुळे नागरिकांना कधी पिण्याच्या पाण्याच्या समस्येला तर कधी विजेच्या समस्येला तर काही ठिकाणी गॅस पाईपलाईन फुटल्याचा तक्रारीही समोर आल्या आहेत. परंतु आजपर्यंत कोणत्याही ठेकेदारावर कारवाई करण्यात आली नाही. खबरदारी घेण्याआधी सुरु असलेली हि कामे नागरिकांना आता डोकेदुखी ठरू लागली आहेत, असे ते म्हणाले.

यासंदर्भात येथील स्थानिक नागरिकांनीही नाराजी व्यक्त केली असून या कामकाजाबाबत ठेकेदारांना संपर्क साधला असता, हि कामे वेळेत पूर्ण करण्याचे आपल्याला आदेश आहेत, अशी उत्तरे संबंधित ठेकेदार आणि मजुरांकडून देण्यात येत आहेत.

हे सर्व चित्र पाहता स्मार्ट सिटी केवळ कागदोपत्री न राहता शहर परिसरात सर्वत्र खोदाई करण्यात आलेली कामे त्वरित न पूर्ण झाल्यास नागरिकांचा रोष प्रशासनाला ओढवून घ्यावा लागेल, शिवाय स्मार्ट सिटी एकीकडे आणि शहराच्या विकासापेक्षा भकासपणा जाणवू लागेल.

यामुळे संबंधित लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि प्रशासन या सर्वानी समन्वय साधून हि कामे वेळेत आणि योग्यरितीने आटोपून शहराचा योग्य तो विकास करणे आवश्यक आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.