Tuesday, January 21, 2025

/

खानापूर जंगलात होत आहे 5 वाघांचे संवर्धन

 belgaum

वन्यजीव संरक्षणाबाबतीतील उपक्रम यशस्वी करण्यासाठी कर्नाटक वनखात्याने केलेल्या समर्पित प्रयत्नांना चांगले फळ आले आहे. “स्टेटस ऑफ टायगर को -प्रीडेटर्स अँड प्रेस इन इंडिया : 2018” अहवालानुसार बेळगाव वनखात्याच्या व्याप्तीतील जंगल प्रदेशात 5 वाघांचे अस्तित्व आहे. केंद्रीय पर्यावरण, अरण्य आणि हवामान बदल खात्याचे मंत्री प्रकाश जावडेकर यांनी यासंदर्भातील अहवाल अलीकडे 28 जुलै रोजी प्रसिद्ध केला आहे.

गेल्या अनेक वर्षापासून बेळगावचे वनखाते वन्यजीव संरक्षणासाठी सातत्याने जे प्रामाणीक प्रयत्न करत आहे त्याचेच हे फळ असल्याचे वन्यजीवन कार्यकर्त्यांचे मत आहे. बेळगांव वनखात्याचा सर्वात मोठा अरण्य विभाग जैवविविधतेने नटलेल्या पश्चिम घाटाचा एक भाग असणाऱ्या खानापूर तालुक्यात आहे. भिमगड अभयारण्य आणि लोंढा, खानापूर, कणकुंबी, बेळगाव तसेच नागरगाळी येथील राखीव अरण्ये ही वन्यप्राण्यांनी समृद्ध आहेत. या ठिकाणी विविध वन्यप्राण्यांचा वाघ, बिबटे, हत्ती, अस्वल, गवे रेडे मोठ्या प्रमाणात आढळून येतात. सदाहरित, अर्ध सदाहरित, ओलसर पर्णपाती व कोरडे पर्णपाती वन, खुजे वन हे प्रकार या जंगल प्रदेशात आढळून येतात

या जंगल प्रदेशात चितळ, सांबर, गवी रेडे, हरीण आदी प्राणी मोठ्या संख्येने असल्यामुळे वाघ, बिबटे आदी मांसाहारी प्राण्यांसाठी हा शिकारघन प्रदेश आहे. हा जंगल प्रदेश कर्नाटकातील काली वाघ अभयारण्य, प्रस्तावित म्हादाई व्याघ्र अभयारण्य आणि गोव्यातील वन्यजीव संरक्षित अरण्य तसेच महाराष्ट्राच्या सह्याद्री व्याघ्र अभयारण्याचा एक संमिश्र भाग आहे. थोडक्यात बेळगाव वनखात्याचा हा प्रदेश मूकांबिका -काली -म्हादाई -कुदरेमुख -भद्रा या पश्चिम घाटातील समन्वयक प्रदेशाचा एक भाग आहे. पश्चिम घाटाच्या या समन्वयीत अरण्यप्रदेशात जवळपास 150 वाघांचे वास्तव्य आहे.

khanapur tiger file pic
khanapur tiger file pic

बेळगावचे उपवनसंरक्षक अधिकारी अशोक पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार खानापूर जंगल प्रदेशात सध्या पाच वाघांचे घरकुल आहे. त्याचप्रमाणे या जंगलात महाराष्ट्र आणि गोव्याच्या जंगलातील भटक्या वाघांचाही वावर असतो. हे प्रामुख्याने दांडेली येथील अन्शी व्याघ्र अभयारण्यात वावरत असतात. खानापूर जंगलातील स्थानिक वाघांनी बछड्यांना जन्म दिलेला असेल तर त्यांची संख्या 5 हून अधिक असू शकते मात्र याबाबत अद्याप खातरजमा झाली नसल्याचे उपवनसंरक्षक अधिकारी अशोक पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

बेळगाव वनक्षेत्रातील पश्चिम घाटात असलेल्या खानापूर तालुका तसेच आसपासच्या भागात वाघांचे संवर्धन करण्यासाठी अनेक उपाय योजना केल्या गेल्या. यासाठी वाघ संरक्षण क्षेत्र देखील तयार केले गेले. वाघांची कमी झालेली संख्या चिंताजनक असल्याने त्यांच्या संवर्धनाचा प्रश्न महत्त्वाचा होता. त्यानुसार लोंढा, खानापूर, कणकुंबी, बेळगाव, नागरगाळी या क्षेत्रांमध्ये वाघ संरक्षणासाठी उपाययोजना केल्या गेल्या. या परिसरात घनदाट वनराई, बांबूचे अच्छादन, हिरवेगार गवत बारमाही वाहणारे पाणी यामुळे चितळ, सांबर, हरीण यांची संख्या मुबलक आहे. वाघांचे खाद्य म्हणून ओळखले जाणारे प्राणी मुबलक प्रमाणात असल्यामुळे येथे वाघांची संख्या वाढली आहे. यामुळे बेळगाव वाघांसाठी संरक्षित क्षेत्र म्हणून पुढे येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.