झुडपात दबा धरून बसलेल्या जंगली अस्वलाने अचानक हल्ला केल्याने एक शेतकरी गंभीर जखमी झाल्याची घटना खानापूर तालुक्यातील चिखले गावानजीक सोमवारी दुपारी घडली.
अस्वलाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या शेतकऱ्याचे नांव शंकर गोविंद गवस (वय 50) असे आहे. शंकर गवस हा कांही कामानिमित्त कणकुंबीला गेला होता. काम आटोपून पारवाड -चिखलेमार्गे तो चालत येत असताना जंगलातील झुडपात दडून बसलेल्या अस्वलाने त्याच्यावर अचानक हल्ला केला.
या हल्ल्यात गवस गंभीररीत्या जखमी झाला असून त्याचा डाव्या कानापासून हनवटीपर्यंतचा जबड्याचा भाग विच्छिन्न झाला आहे.
अस्वलाने हल्ला केल्याचे लक्षात येताच आसपास असलेल्या लोकांनी आरडाओरड करताच अस्वलाने पलायन केले. त्यानंतर नागरिकांनी शंकर गवस याला तातडीने बेळगाव जिल्हा इस्पितळात उपचारासाठी दाखल केले आहे.