सोशल मीडियावर बदनामीकारक पोस्ट शेअर केल्यामुळे संतप्त जमावाने बंगळूर येथील काँग्रेसचे आमदार श्रीनिवास मूर्तींच्या घरावर हल्ला करत तोडफोड केली. या हल्ल्याचा निषेध करत रेल्वे राज्य मंत्री सुरेश अंगडी यांनी हल्लेखोरांचा देशद्रोही म्हणून उल्लेख केला आहे.
बेळगावमध्ये आज पत्रकारांशी बोलताना त्यांनी हि प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. बंगळूरमध्ये झालेला हा प्रकार निंदनीय असल्याचे त्यांनी म्हटले आहे. संपूर्ण जगात झपाट्याने वाढत चाललेले कोरोनाचे संकट भीतीदायक आहे. प्रधानमंत्री हि परिस्थिती सुधारण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असून संपूर्ण जगाचे भारताकडे लक्ष लागून राहिले आहे.
अशा परिस्थितीत सामाजिक शांतता बिघडविण्याचा प्रयत्न काही समाजविघातक प्रकृतींकडून केला जात आहे. यामागे गद्दारांचा हात असून अशा हल्लेखोरांना देशद्रोही म्हणून जाहीर करावे, अशी प्रतिक्रिया यावेळी त्यांनी व्यक्त केली आहे.
राज्यात मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा तसेच गृहमंत्री बोम्मई कायद्याचे संरक्षण करण्यासाठी कार्यरत आहेत, परंतु काहींनी भाजपाला बदनाम करण्यासाठी हा कट रचला आहे असेही ते म्हणाले.
पोलीस चौकी, रुग्णालयांना आग लावणाऱ्यांवर तसेच कोरोना वॉरियर्स, पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या आणि कायदा आपल्या हातात घेणाऱ्या अशा समाजकंटकांवर कडक कारवाई केली जावी, अशी मागणीही त्यांनी सरकारकडे केली आहे.