सरकारी, निमसरकारी किंवा खासगी क्षेत्रात कार्यरत असणारे अनेक कर्मचारी असतात, जे खरोखर आपल्या सेवेप्रती आदर आणि प्रामाणिकपणे कार्यरत असतात. आपल्या कामात प्रामाणिकपणे आणि संपूर्णपणे स्वतःला झोकून देऊन कार्य करणारे असे अनेक अवलिया असतात.
केवळ आपल्या निष्ठेच्या जोरावर शेवट्पर्यंत काम करणारे असे अनेक कर्मचारी आहेत. मग ते काम छोटे असो व मोठे.. अशाच एका अवलियाने आज आपला पदभार दुसऱ्याला सोपवताना निष्ठा, प्रामाणिकपणा आणि विनम्रतेचे दर्शन घडविले आहे.
पुर्वाश्रमीचे बेळगावचे शहर पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत असणारे भास्कर राव हे बंगळूर येथे कमिशनर पदावर रुजू होते. नुकतीच त्यांची बदली झाली आणि बंगळूर येथील कार्यालयातून त्यांनी विनम्रता पूर्वक निरोप घेतला. आपला पदभार दुसऱ्यावर सोपवून बदली झालेल्या ठिकाणी रुजू होण्याआधी आपल्या खुर्ची आणि कार्यालयात नतमस्तक होऊन त्यांनी विनम्रतापूर्वक निरोप घेतला.
भास्कर राव यांनी बेळगाव उत्तर विभागाचे आयजीपी पद भूषविले होते. यासह बेळगाव शहराचे पहिले पोलीस आयुक्त बनण्याचा मानही त्यांनाच जातो. यांच्या कार्यकाळातच बेळगाव शहर पोलीस आयुक्तालयाची स्थापना करण्यात आली होती. त्याआधी बेळगाव शहर देखील जिल्हा पोलीस अधिक्षकांच्या कक्षेत येत होते. भास्कर राव यांची बदली बेळगावमधून बंगळूर येथे करण्यात आली होती.
आज पुन्हा बंगळूर येथे कमिशनर पदावरून त्यांची बदली झाली आणि त्यांच्या जागी नवे आयुक्त कमल पंत हे रुजू झाले आहेत. या दरम्यान बंगळूर येथे कार्यरत असणाऱ्या भास्कर राव यांनी आपल्या कार्याच्या आदराचे आणि आपुलकीचे दर्शन घडविले आहे.