कॅन्टोन्मेंट बोर्ड बेळगावतर्फे हे आज शुक्रवारी सकाळी सुमारे 200 रोपट्यांचे वृक्षारोपण करून मोठ्या उत्साहात वनमहोत्सव साजरा करण्यात आला.
कॅम्प येथील कॅन्टोन्मेंट बोर्ड कार्यालयाच्या आवारातील उद्यानामध्ये आज शुक्रवारी सकाळी वनमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अशोक नाईक आणि कॅन्टोन्मेंट बोर्डच्या उपाध्यक्षा निरंजना अष्टेकर यांच्या हस्ते वृक्षारोपण करून या वनमहोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला.
पर्यावरणाचे संरक्षण व्हावे या उद्देशाने हा वन महोत्सवाचा उपक्रम राबविण्यात आल्याचे आणि उपक्रम यशस्वी करण्यासाठी साजिद शेख यांच्यासह कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सर्व सदस्य, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहकार्य लाभल्याचे सीईओ अशोक नाईक यांनी वनमहोत्सवानंतर बोलताना सांगितले.
या वनमहोत्सवादरम्यान कॅन्टोन्मेंट बोर्ड कार्यालयासमोरील उद्यानासह आवारात विविध जातींची झाडे तसेच शोभेच्या झाडांच्या सुमारे 200 रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी सीईओ नाईक, उपाध्यक्षा अष्टेकर, कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सदस्य साजिद शेख, ऑफिस सुपरिटेंडेंट यम. वाय. टाळूकर, सहाय्यक अभियंता एस व्ही मण्णूरकर, स्वच्छता निरीक्षक नागेश सक्की आदींसह कॅन्टोनमेंट बोर्डाचा स्टाफ, हॉस्पिटल स्टाफ, शाळेचे शिक्षक, कर्मचारी आणि कॅन्टोन्मेंट कर्मचारी उपस्थित होते.