बेळगाव शहरात जुने रणगाडे मोकळ्यावर पडून आहेत जे ऊन-पाऊस वादळवाऱ्यात एक मूक प्रेक्षक बनून काळाशी लढा देत आहेत. आश्चर्य वाटले ना? परंतु हे खरे आहे. होय, शहरातील टिळकवाडी नजीकच्या गुरुप्रसाद कॉलनी पलीकडे मंडोळी रोड शेजारील विस्तीर्ण माळरानावर हे ब्रिटिशकालीन दोन रणगाडे आज देखील जीर्णावस्थेत आपले अस्तित्व टिकून उभे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार हे रणगाडे 1960 सालापासून या ठिकाणी माळरानात जीर्णावस्थेत काळाशी लढा देत उभे आहेत. गोव्यातील पोर्तुगिजांवर विजय मिळवण्यासाठी त्याकाळात भारतीय लष्कराचे बेळगांव हे “बेस स्टेशन” होते. तेंव्हापासून म्हणजे गेल्या 50 वर्षांपेक्षा अधिक काळापासून मंडोळी रोड नजीकच्या माळरानावर हे “डेरीलिक्ट शर्मन डीडी टँक” प्रकारचे रणगाडे गंज खात पडून आहेत. सदर रणगाडे खरेतर ऐतिहासिक लढाऊ लष्करी वाहन म्हणून जतन केले जावयास हवे होते. परंतु दुर्दैवाने सध्या ते “बॉटल टँक कम कचरा टँक” झाले आहेत.
या दोन्ही रणगाड्यांमध्ये आतल्या बाजूला बिअरच्या बाटल्या दारू व गुटख्याची पाकिटे यांचा खच पडलेला दिसून येतो. थोडक्यात या दुर्लक्षित रणगाड्यांचा अनेक गैरकृत्यांसाठी राजरोस वापर केला जातो.
या रणगाड्यांकडे असेच दुर्लक्ष होत एक दिवस ते इतिहासजमा होणार हे निश्चित आहे. तेंव्हा प्रशासनाने याकडे लक्ष देऊन त्यांना एमएलआयआरसीच्या ताब्यात द्यावे अथवा एखाद्या चौकात किंवा बागेत ठेवून या रणगाड्यांची स्मारकात रुपांतर केले जावे.
दरम्यान, तब्बल 5 दशकांहून अधिक काळ लोटला तरी अद्यापपर्यंत माळरानातून हे रणगाडे हटवून अन्यत्र स्थलांतरित का करण्यात आले नाहीत? याचे उत्तर आजतागायत कोणालाच मिळालेले नाही जर ते गोवा मुक्ती लढ्यादरम्यान वापरण्यात आलेले रणगाडे असतील तर ऐतिहासिक क्षणाची साक्षीदार असणारी ही लढाऊ लष्करी वाहने गंज खात पडू देणे कितपत योग्य आहे? या रणगाड्यांची पुनरुज्जीवन करून त्यांना नष्ट होण्यापासून वाचवता येणार नाही का?