कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन बेळगाव महापालिकेने सध्या स्वच्छता अभियानावर अधिक लक्ष केंद्रीत केले असून शहरातील प्रदूषण व अस्वच्छता कमी करण्यावर भर देण्यास सुरुवात केली आहे. या अनुषंगाने महापालिकेकडून प्रायोगिक तत्त्वावर घरोघरी जाऊन कचरा गोळा करणाऱ्या “इलेक्ट्रिक गार्बेज पिकिंग व्हेईकल” अर्थात इलेक्ट्रिक कचरा वाहनांचा नवा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
बेळगाव महापालिकेने सध्या दोन इलेक्ट्रिक गार्बेज पीकिंग व्हेईकल्स (ईजीपीव्ही) प्रायोगिक तत्त्वावर सुरू केल्या आहेत. शहरातील ज्या अरुंद रस्ते असलेल्या भागात मोठ्या कचरा वाहू गाड्या जाऊ शकत नाहीत अशा भागांमध्ये जाऊन या इलेक्ट्रिक कचरा वाहू गाड्या कचरा गोळा करतील. इलेक्ट्रिकवर चालणाऱ्या या गाड्या पर्यावरण पूरक असल्यामुळे कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होणार नाही. महापालिका आयुक्त जगदीश के यांनी नुकतीच या दोन नव्या इलेक्ट्रिक गार्बेज पीकिंग व्हेईकल्सची पाहणी केली.
या दोन ईजीपीव्ही गाड्या कचऱ्याने पूर्णपणे भरण्यात आल्यानंतर शहरातील काही ही चढावाच्या रस्त्यावर त्यांची चाचणी घेण्यात आली. याप्रसंगी मनपा आयुक्त जगदीश जातीने उपस्थित राहून सदर गाड्यांची कार्यक्षमता पडताळून पाहिली. सदर प्रात्यक्षिकानंतर पत्रकारांशी बोलताना आयुक्त जगदीश म्हणाले की, शहरातील काही भागात अत्यंत अरुंद रस्ते असल्यामुळे प्रकार मेकांना त्या ठिकाणी कचरा गोळा करताना अडचणींचा सामना करावा लागतो अरुंद रस्ते असल्यामुळे कचरा गाडी गल्लीच्या कोपऱ्यावर उभी करून पौरकार्मिकांना घरोघरी गोळा केलेला अस्वच्छ कचरा त्या गाडीपर्यंत वाहून न्यावा लागतो. सध्याचा कोरोना प्रादुर्भाव लक्षात घेता ही बाब पौरकार्मिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक आहे, हे लक्षात घेऊन त्यावर पर्याय म्हणून या ईजीपीव्ही गाड्या वापरल्या जाणार आहेत.
यामुळे कचरा गोळा करण्याचे काम सोपे होण्याबरोबरच पौरकार्मिकांचे आरोग्यही सुरक्षित राहणार आहे. सदर वाहनांचा प्रायोगिक तत्त्वावरील हा उपक्रम यशस्वी झाल्यास गरजेनुसार या पद्धतीची आणखी इलेक्ट्रिक गार्बेज पीकिंग व्हेईकल्स कार्यान्वित केली जातील, असेही मनपा आयुक्त जगदीश के. एच. यांनी स्पष्ट केले.