आगामी 2023 सालची लोकसभा निवडणूक जिंकून राज्यात पुन्हा काँग्रेसची सत्ता स्थापन करण्याचा माझा निर्धार असून त्यासाठीच मी माझ्या नव्या गाडीचा नंबर 2023 ठेवला आहे, अशी माहिती केपीसीसीचे कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी दिली.
अंधश्रद्धा निर्मूलनासाठी केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी आपल्या नव्या कार गाडीचे पूजन आज सकाळी सदाशिवनगर स्मशानभूमीमध्ये केले. या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी आपला उपरोक्त निर्धार बोलून दाखविला. ते पुढे म्हणाले की, सध्या राज्य सरकार जे लाॅक डाऊन करत आहे त्याची खरंतर कांही आवश्यकता नाही. कोरोनावर लॉक डाऊन हा उपाय नाही, या उलट सरकारने चिकित्सेवर अधिक ध्यान दिले पाहिजे. यासाठी खाजगी रुग्णालयांची मदत घेतली गेली पाहिजे. जी रूग्णालयं मदत करण्यास तयार नसतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा सरकारला अधिकार आहे. त्याचा वेळ प्रसंगी वापर केला जावा. खासगी रुग्णालयांच्या सहकार्याने राज्यभरातील चिकित्सा क्षमता वाढवली गेली पाहिजे. लॉक डाऊनमुळे लोक आधीच त्रासले आहेत पुन्हा लॉक डाऊन झाल्यास ते आणखीनच त्रासतील, असे मत जारकीहोळी यांनी व्यक्त केले.
आपल्या नव्या गाडीच्या क्रमांका बद्दल बोलताना आपण जाणीवपूर्वक मुद्दाम आपल्या गाडीचा क्रमांक केए 49 एन 2030 असा ठेवला असल्याचे सतीश जारकीहोळी यांनी सांगितले. आगामी 2023 सालची राज्यातील लोकसभा निवडणुक जिंकून देऊन मला काँग्रेसला पुन्हा सत्तेवर आणावयाचे आहे. माझा निर्धार लोकांच्या कायम लक्षात राहावा यासाठी हा 2023 क्रमांक आहे. यासाठी माझी ही गाडी जिथे जिथे जाईल तेंव्हा तेथील विरोधकांना आणि जनतेला राज्यात काँग्रेसला जिंकून देण्याच्या माझ्या या निर्धाराची आठवण होईल, असेही जारकीहोळी यांनी स्पष्ट केले.
तुम्हाला राज्याचा मुख्यमंत्री बनण्याची इच्छा आहे का? या प्रश्नाला उत्तर देताना काँग्रेस पक्षाला पुन्हा राज्यात सत्तेवर आणणे हे आमचे मुख्य ध्येय असून त्यानंतर कोणाला मुख्यमंत्री करायचे याचा निर्णय पक्षाचे हायकमांड घेईल, असे सतीश जारकीहोळी यांनी सांगितले. राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट काँग्रेस पक्ष सोडून जाण्याची भाषा करत आहेत याबद्दल आपले मत व्यक्त करताना व्यक्तीपेक्षा पक्ष महत्त्वाचा आहे.
सचिन पायलट यांच्या सारखे लोक येतात जातात, परंतु पक्ष अबाधित असतो अशा लोकांच्या येण्या जाण्याने पक्षाला काहींही फरक पडत नसल्याचे केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी सांगितले.