नाग पंचमीच्या मुहूर्तावर वनखात्याच्या पथकाने एका देखण्या अस्सल नाग सापाची गारूड्यांच्या बंदिवासातून सुटका केल्याची घटना दुसरे रेल्वेगेट टिळकवाडी येथे आज शुक्रवारी सकाळी घडली.
वनखात्याचे डीआरएफओ विनय एस. गौडर, आरएफओ आर. एस. डोंबगी आणि वनरक्षक मल्लिकार्जुन जोतेण्णावर यांनी टिळकवाडी येथील दुसऱ्या रेल्वे गेटनजीक दोघा गारुडी महिलांना अडवून त्यांची चौकशी केली. त्यावेळी नागपंचमीनिमित्त धार्मिक कार्याच्या नांवाखाली संबंधित महिला बेकायदेशीररित्या नाग सर्पाचा वापर करत असल्याचे निदर्शनास आले. तेंव्हा वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी टोपलीत बंद असलेला अस्सल नाग साप जप्त केला.
त्यानंतर गारुड्यांच्या बंदिवासातून मुक्त केलेल्या त्या सापाला त्यांनी मच्छे येथील वृक्ष बागेमध्ये नैसर्गिक अधिवासात सोडून दिले.
वनखात्याच्या या पथकाने टिळकवाडी उपरोक्त कारवाई केली त्यावेळी सामाजिक कार्यकर्ते हे संतोष दरेकर व इतर उपस्थित होते. त्याचप्रमाणे गारुडी महिलांवर होत असलेली कारवाई पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी झाली होती. दरम्यान, नागपंचमीनिमित्त बंदिस्त टोपलीत साप घेऊन फिरणाऱ्या गारुड्यांना नागरिकांनी भीक घालू नये.
हे गारुडी प्राणी संरक्षण कायद्याचा भंग करून जनतेच्या धार्मिक भावनांचा गैरफायदा घेत असतात. तेंव्हा अशा लोकांबद्दल तात्काळ वनखात्याला माहिती द्यावी, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते संतोष दरेकर यांनी केले आहे.