मच्छे येथे आठ वर्षे बालकाचा कुत्र्यांनी चावा घेतल्यामुळे तो जखमी झाला होता. मात्र दोन महिन्यांनंतर त्याचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ माजली असून कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.
याकडे आता महानगरपालिकेने तसेच ग्रामपंचायतीने लक्ष देण्याची गरज असून आणखी किती जणांचा बळी घेणार असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
बेळगाव तालुक्यातील मच्छे गावामध्ये दोन महिन्यांपूर्वी कुत्रा चावलेल्या शहापूरमधील आनंदवाडीतील ८ वर्षीय मुलाचा आज जिल्हा रुगणालयात मृत्यू झाला.
मच्छे गावात दोन महिन्यांपूर्वी शहापूर, आनंदवाडीतील सोहम सुनील बेनके हा मुलगा जखमी झाला होता. बुधवारी रात्री त्याची प्रकृती बिघडल्याने त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र गुरुवारी त्याचा मृत्यू झाला.
यासंबंधी माहिती देताना मृत सोहमच्या वडिलांनी सांगितले कि दोन महिन्यांपूर्वी सोहमला मच्छे मध्ये कुत्रा चावला होता. हॉस्पिटलमध्ये तीन वेळा दाखवले. काल त्याची प्रकृती आणखी बिघडल्याने जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. पण उपचाराचा उपयोग न होता त्याचा मृत्यू झाला. मच्छे मध्ये मोकाट कुत्र्यांची संख्या वाढली असून त्यांचा उपद्रव वाढला आहे. संबंधित विभागाने या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा असा आग्रह त्यांनी केला.
मोकाट कुत्र्याने चावल्याने एका मुलाचा नाहक बळी गेला. संबंधित विभागाने या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची गरज आहे. कुत्र्याने चावून सोहमचा मृत्यू झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मच्छे परिसरात कुत्र्यांचा उपद्रव वाढतच आहे. त्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे.