उद्यमबाग येथील स्टार असोसिएट या कारखान्यात आज एक दुर्मिळ साप आढळला आहे. साधारण 14 इंच लांबीचा हा साप दुर्मिळ जातीचा असून हा बिनविषारी साप आहे. या कारखान्यातील कर्मचारी एका दुसऱ्या सापाच्या शोधात होते. परंतु या सापाचा शोध घेता घेता हा दुसराच साप दृष्टीस पडला आहे.
या सापाला पकडण्यासाठी सर्पमित्र आनंद चिठ्ठी यांना बोलाविण्यात आले होते. यावेळी सर्पमित्र आनंद चिठ्ठी यांनी या सापाबद्दल अधिक माहिती दिली आहे.
बदामी रंगाचा हा साप बिनविषारी असून सामान्यपणे आढळणाऱ्या कवड्या या सर्पाच्या स्वभावाशी व शरीररचनेशी बरेच साम्य असणाऱ्या या सापाच्या कातडीवर तोंडापासून शेपटीपर्यंत पांढऱ्या आडव्या फुल्या असतात. सापाच्या पोटाचा भाग हा मोती रंगाचा असतो. हा साप सुंदर व ऐटबाज असून हा साप आपल्या मूळ लांबीपेक्षा 21 इंचापर्यंत वाढू शकतो. साधारणपणे सहा अंडी देणारा हा साप निशाचर असून डोंगराळ भागात आढळतो.
हा साप पाल खाण्यासाठी घरात येण्याची शक्यता असते. भारतात केरळ, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, व ओरिसा इथे हा साप आढळल्याची नोंद आहे. परंतु कर्नाटकात हा साप पहिलीच वेळ आढळलेला आहे. यामुळे हा संशोधनाचा विषय असू शकतो.
यापूर्वीही वॅक्सीन डेपो परिसरात दुर्मिळ सर्प आढळलेले आहेत. यामुळे वन्य जीवांच्या बाबतीत हा परिसर अतिशय संवेदनशील असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. यासारख्या जीवांचे जतन व प्रजोत्पादन होण्यासाठी संशोधन होणे गरजेचे असून सरकारने व वनविभाग आणि संशोधकांना एकत्र आणून याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे असे सर्पमित्र आनंद चिठ्ठी यांनी सांगितले.