वाढत्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर बीम्स हॉस्पिटल दिवसेंदिवस वादाच्या भोवऱ्यात अडकत चालले आहे. कोरोना रुग्णावर याठिकाणी योग्य उपचार होत नसल्याच्या आरोपाबरोबरच सर्वसामान्य रुग्णांचे देखील याठिकाणी हाल होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. यात भर म्हणून की काय, आज शनिवारी सकाळी एका रुग्णाचा बीम्स हॉस्पिटलच्या दारातच मृत्यू झाल्यामुळे बीम्स प्रशासन अडचणीत आले आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, रुक्मिणीनगर येथील एका 45 वर्षीय व्यक्तीच्या छातीत दुखत असल्याने त्याला उपचारासाठी बीम्स हॉस्पिटलकडे आणण्यात आले. मात्र हॉस्पिटलमधील बाह्यरुग्ण विभागात अर्थात ओपीडीमध्ये डॉक्टर आणि कर्मचारीच जागेवर नव्हते. परिणामी तासभर ऑटोरिक्षामध्ये वाट बघत बसून असलेल्या त्या व्यक्तीच्या छातीतील वेदना असह्य झाल्या आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला.
डॉक्टरांच्या दुर्लक्षामुळे अशाच प्रकारे अथणी येथील एका रुग्णाचा शुक्रवारी बीम्स हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाल्याची तक्रार मृताच्या नातलगांनी केली होती. त्यानंतर आज शनिवारी लगोलग रुक्मिणीनगर येथील एका व्यक्तीचे वेळेवर उपचार न झाल्यामुळे बीम्सच्या दारातच निधन झाले.
या दोन्ही मृत्यूमुळे बीम्स प्रशासनाच्या एकंदरीत कारभाराबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या गलथान आणि हलगर्जी कारभारामुळे रुग्णांचे जीव जात असल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.